घरमुंबईमदत पूरग्रस्तांना

मदत पूरग्रस्तांना

Subscribe

पूरग्रस्तांना मदत व स्वच्छता मोहीम

कुणबी समाजाचे सुर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, पालघर यांनी कोल्हापूर पूरग्रस्तांना स्वखुशीने मदत निधी गोळा केला केली.या मदत निधीमधून शिरोळ येथील शिरटी, हासुर, घालवड येथील 125 कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंची मदत केली. तसेच स्वच्छता संवर्धन मोहीम आयोजित करण्यात आली. स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या एकूण 30 प्रतिनिधींनी आरोग्य केंद्राच्या 4 खोल्यांची, मधले 4 पॅसेज, कपाटामधील खराब औषधे, भिजलेले पेपरचे गठ्ठे, मशिनरी, बिछाने, ब्लँकेट व गाळ साफ करून स्वच्छता केली. यामुळे परिसरातील लोकांना ओपिडी सेवेचा फायदा होणार आहे. दरवर्षीपणे यावर्षी देखील युवाशक्ती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना व पुण्यस्मरण मोहीम उपक्रम पूर्ण केला.

पूरग्रस्तांसाठी 15 टन साहित्य

पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर तेथील रहिवाशांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू पाठवण्याबाबत पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आवाहन केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा शाखेच्या वतीने 15 टन वजनाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचा ट्रक आज सांगली जिल्ह्यातील बाधितांसाठी रवाना करण्यात आला.

- Advertisement -

या साहित्यांचे 998 किट तयार करण्यात आले असून त्यामध्ये 5 किलो आटा, 1 किलो साखर, 5 किलो तांदुळ, 1 किलो डाळ, 500 ग्राम कडधान्य, 1 लिटर तेल, 500 ग्राम बेसन, 500 ग्राम मीठ, 200 ग्राम दूध पावडर, 50 ग्राम हळद पावडर, 100 ग्राम मिरची पावडर, 10 मेणबत्त्या, 2 माचिस डब्या, 100 ग्राम चहा पावडर, 50 ग्राम टुथ पेस्ट आणि टुथ ब्रश, 1 आंघोळीचा साबण, 1 कपड्याचा साबण, 1 टॉवेल, मोहरी पुडी आणि जिरे पुडी यांचा समावेश आहे. याबरोबरच मेडिसीन किट आणि इतर साहित्यांचे पाच बॉक्स, 70 किलो तांदुळ, 10 किलो डाळ व इतर गृहोपयोगी सामान आणि वापरावयाच्या कपडेदेखील पाठवण्यात आले आहेत. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, तहसीलदार रेवननाथ लबडे, उज्ज्वला भगत, पुरवठा शाखेचे नायब तहसीलदार संभाजी पावरा यांच्यासह शाखेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

लोहरे गावातून जनावरांसाठी हिरवा चारा

कोल्हापूर, सांगलीमधील महापुरानंतर वाचलेल्या पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर झालेला असताना त्यासाठी मदत म्हणून समाजसेवक मंदार गडकरी यांच्या सहकार्याने तालुक्यातील लोहरे ग्रामस्थांनी श्रमदानातून ट्रक भरून सकस हिरवा चारा पाठवला आहे. ट्रक रवाना करताना तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, नायब तहसीलदार समीर देसाई, पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, शिवसेना शहरप्रमुख सुरेश पवार, उपसरपंच शिवराम पवार, सुनील जगताप, सुंदर शेडगे, दीपक पवार उपस्थित होते.

- Advertisement -

मुस्लीम समाजाची पूरग्रस्तांना मदत

कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना कर्जत तालुक्यातील दामत, ममदापूर आणि गोरेगावमधील मुस्लीम समाजाने गोळा केलेल्या मदतीचे थेट सांगलीमध्ये जाऊन वितरण केले. दामत या मुस्लीम बहुल वस्तीच्या गावाची आर्थिक परिस्थिती जेमतेम अशी आहे. कष्टाने मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी मंडळी, अशी तेथील ग्रामस्थांची ओळख आहे. महापुराचे संकट आणि त्याची तीव्रता लक्षात घेऊन प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने मदतीचा हात पुढे करत आपल्या मराठी बांधवांविषयी दया आणि आपुलकी दाखवून दिली. आवाहन करताच गावातील मशिदीच्या हॉलमध्ये मदत जमा होऊ लागली. किराणा सामानापासून कपडे, ब्लँकेट्स, गोधड्या, चादरी, सॅनिटरी पॅड, तांदूळ, आटा आणि बिस्किट्स इत्यादीचा त्यात समावेश होता. या कार्यात शेजारी असलेल्या ममदापूर आणि गोरेगाव येथील मुस्लीम समाजानेही हातभार लावत 4 लाखांचे साहित्य गोळा केले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरवळ तालुक्यातील राजापूर आणि आळस या दोन गावात दामत गावातील तरुणांनी ट्रकमधून साहित्य नेले. सरफराज नजे, अश्फाक नजे, साजिद नजे, नासिर नजे, नइम आढाळ, तसेच साजिद शब्बीर नजे, सरफराज नजे, तौसिफ सरवले, एजाज टीवाले, अश्फाक नजे, मुझममिल शब्बीर नजे आणि इतर तरुणांचा त्यात समावेश होता.

मुरुडमधून १० टन हिरवा चारा

कोल्हापूूूर व सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरातून वाचलेल्या पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने मदत म्हणून तालुक्यातून 10 टन हिरवा चारा पाठविण्यात आला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे व जिल्हा उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हा चारा येथील पशु संवर्धन विभागाकडून गोळा करण्यात आला. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन पाडावे, डॉ. सुभाष दिवटे, डॉ. विनायक पवार, उरणचे डॉ. संतोषसिंग डाबेराव, सहाय्यक जितेंद्र गावंड यांनी यासाठी सहकार्य केले. सांगली जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्‍यांनी रायगडच्या या सर्व अधिकार्‍यांचे कौतुक करून धन्यवाद दिले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य दिले

प्रभादेवीच्या सौरभ मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना मदत केली. मंडळाच्या आवाहनानंतर प्रभादेवीतील कामगार नगर नं. 2 मधील शाळकरी विद्यार्थ्यांनी पूरात वह्या-पुस्तके गमावलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या दप्तरातील कोर्‍या वह्या देऊन मदतीचा अनोखा आधार दिला. नगरातील शेकडो विद्यार्थ्यांनी वह्या आणि पेन दिल्यामुळे कोल्हापूरच्या इचलकरंजीतील ताकवडे भागातील शेतमजूरांच्या शेकडो मुलांना शालेय वस्तू देता आल्या. सौरभच्या या कर्तव्याचे इचलकरंजीच्या स्थानिक नागरिकांनी मनापासून आभार मानले.

आळंदी देवस्थानाकडून १० लाख रुपये

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या वतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्तांसाठी प्रत्येकी ५ लाख रुपये याप्रमाणे एकूण दहा लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे देण्यात आला. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील हे उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीचे जाणीवेतून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देवून आवश्यक तेथे संसार उपयोगी भांडी, धान्य, किराणा, शालेय साहित्य, पिण्याचे पाणी, घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करणार असल्याचे ढगे पाटील यांनी सांगितले.

वर्तक महाविद्यालयाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

सामाजिक जाणीवेतून वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष शेंडे, उपप्राचार्य डॉ.अनिल शेळके व उपप्राचार्य प्रा.स्मिता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, ग्रंथालय तसेच आजीवन आणि निरंतर शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम करून मदत संकलन केले. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना मदतीसाठी आवाहन करून प्रामुख्याने शैक्षणिक साहित्याच्या व जीवनावश्यक वस्तूंच्या रुपाने ही मदत संकलित केली. कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्याकडून या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाविद्यालायकडून शालोपयोगी वस्तू, सॅनिटरी नॅपकिन्स,तसेच बिस्किटे या स्वरूपात मदत करण्यात आली. या मदतकार्यात विशेष करून सहायक ग्रंथपाल कृपाल शिंदे, प्रा.कनिका भार्गव आणि प्रा. शैलेश औटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. सचिन पिसे यांनी दिली. महाविद्यालयातर्फे संकलित केलेली ही शैक्षणिक साहित्याची मदत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यासाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत पाठवली गेली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -