घरमुंबईवाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका शक्य

वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका शक्य

Subscribe

ठाण्यातील विकासकामे मार्गी लागत असतानाच शहर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयीच्या नियोजनाची माहिती दिली. महानगरने त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी हा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी केल्या जाणार्‍या उपायांचे अभ्यासपूर्ण विवेचन केले.

वाहतूक कोंडीच्या त्रासातून ठाणेकरांची कधी सुटका होणार?

पुणे, नाशिक, अहमदाबाद, जेएनपीटी अशा सर्व दिशांना जाणारी वाहने ठाणे शहरातून जातात. त्यामुळेच ठाण्यातले रस्ते, महामार्ग आणि घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होते. यावर उपाय म्हणून सध्या कोपरी पूल रुंदीकरण आणि मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तीन हात नाका येथे सध्याच्या उड्डाणपुलाच्या जागी ग्रेड सेपरेटरच्या माध्यमातून मल्टिलेव्हल फ्लायओव्हरचे नियोजन आहे. याखेरीज कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीलाही केंद्राची मंजुरी मिळाली आहे.

- Advertisement -

घोडबंदर मार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी गायमुख ते फाउंटन हॉटेल असा एलिव्हेटेड मार्ग एमएसआरडीसीच्या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर बोरिवलीकडे जाणार्‍या वाहनांना नाहक घोडबंदर मार्गाला वळसा घालून जावं लागतं. त्यावर तोडगा म्हणून टिकुजिनी वाडी ते बोरिवली असा भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल एमएसआरडीसी तयार करत आहे. हा मार्ग झाल्यावर ठाणे ते बोरिवली हे अंतर अवघ्या 10 मिनिटांवर येईल. या खेरीज साकेत ते गायमुख असा कोस्टल मार्ग आणि श्रीनगर ते गायमुख असा फुटहिल रोड हे घोडबंदर मार्गाला दोन पर्यायी मार्गही प्रस्तावित आहेत. त्यामुळे घोडबंदर मार्गावरही वाहतूककोंडीची समस्या राहाणार नाही.

क्लस्टर योजना अद्याप कागदावरच आहे.
क्लस्टर योजना ही देशातील इतक्या मोठ्या प्रमाणावरील पहिलीच योजना आहे. जवळपास 1500 हेक्टर, म्हणजे शहराच्या 23 टक्के भूभागावर ही योजना राबवली जाणार आहे. त्यामुळे या योजनेसमोरच्या अडचणीही हिमालयाएवढ्या होत्या. अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारकडे कुठलेही धोरण नव्हते. ठाण्यात दर पावसाळ्यात अशा इमारती कोसळून माणसं किडेमुंग्यांसारखी हकनाक मरत होती. त्यामुळे या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेचा आग्रह आम्ही सातत्याने सरकारकडे धरत होतो. तत्कालीन आघाडी सरकारने गेल्या निवडणुकीच्या तोंडावर जी योजना जाहीर केली, त्यात असंख्य त्रुटी होत्या. युतीचे सरकार आल्यानंतर या योजनेतील त्रुटी एक-एक करून दूर केल्या. रहिवाशांना मालकी हक्काचं, 323 चौरस फुटांचं घर विनामूल्य आणि जमीनमालकालाही मोबदला या दोन महत्त्वाच्या तरतुदी केल्या. माननीय उच्च न्यायालयाकडून योजनेला हिरवा कंदिल मिळवला आणि आता किसननगर भागातून योजनेला सुरुवात होत आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने गेल्या पाच वर्षांत तुम्हाला सर्वाधिक समाधान देणारे काम कुठले?
असे एकच काम सांगता येणार नाही. ठाण्याच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही अनेक प्रकल्पांची मागणी विरोधी पक्षात असताना सातत्याने तत्कालीन आघाडी सरकारकडे करत होतो. मात्र आता हे सर्व प्रकल्प गेल्या पाच वर्षांत मार्गी लावण्यात यश मिळाले, हेच सर्वात मोठे समाधान आहे. त्यात क्लस्टर योजना, मेट्रो, कोपरी पूल रुंदीकरण, कोपरी पूर्व येथील सॅटिस प्रकल्प, सीआरझेड बाधित क्षेत्र कमी करून कोळीवाडे व गावठाणांच्या पुनर्विकासाला चालना, शहरांतर्गत मेट्रो, जुन्या अधिकृत इमारतींचा पुनर्विकास असे अनेक प्रकल्प आहेत, जे पूर्ण झाल्यानंतर ठाण्याचा चेहरामोहरा बदललेला असेल.

ठाण्याला स्वतंत्र धरण कधी मिळणार?
ठाण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाण्यासाठी स्वतंत्र धरण असले पाहिजे, अशी मागणी आम्ही गेली अनेक वर्षे करत होतो. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातील काळू धरणाचा प्रकल्प वादात सापडला. युतीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री या नात्याने या प्रकल्पासमोरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काळू धरणासाठी लागणार्‍या वनजमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून वनविभागाला 259 कोटी रुपये अदा करण्याची माझी विनंती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मान्य केली. त्यामुळे वनजमिनीचा मुख्य प्रश्न सुटला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -