Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी घाबरू नका! मृत पक्षी, कोंबड्यांची माहिती देण्यासाठी वापरा 'हा' हेल्पलाईन क्रमांक

घाबरू नका! मृत पक्षी, कोंबड्यांची माहिती देण्यासाठी वापरा ‘हा’ हेल्पलाईन क्रमांक

नागरिकांनी जर संबंधित यंत्रणेला कळवले तर लगेचच मृत कोंबडी, पक्षी, कावळा यांना तात्काळ ताब्यात घेण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल,असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

Related Story

- Advertisement -

देशात व राज्यातील काही जिल्ह्यात दाखल झालेल्या ‘बर्ड फ्ल्यू’ ने आता मुंबई गाठली आहे. गेल्या दोन – तीन दिवसात जवळजवळ २५ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन मृत कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने राज्य सरकार व मुंबई महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बर्ड फ्ल्यूबाबत संबंधित यंत्रणेची तातडीने बैठक घेतली व उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

पालिकेने रात्री उशिराने ‘बर्ड फ्ल्यू’ बाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, मुंबईत कुठेही मृत कोंबड्या, कावळे, पक्षी आढळून आल्यास नागरिकांनी, कोंबडी विक्रेते यांनी घाबरून न जाता तात्काळ मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या ‘१९१६’ या हेल्पलाईनवर संपर्क साधून कळवावे. तसेच, शासनाने नियुक्त केलेल्या रॅपिट रिस्पॉन्स टीममधील डॉ.हर्षल भोईर : ९९८७२८०९२१ आणि डॉ.अजय कांबळे : ९९८७४०४३४३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. नागरिकांनी जर संबंधित यंत्रणेला कळवले तर लगेचच मृत कोंबडी, पक्षी, कावळा यांना तात्काळ ताब्यात घेण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल,असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबईत बर्ड फ्ल्यू दाखल झाला असून काही कावळ्यांचा मृत्यू झाल्याने सरकार व पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आता मुंबईतील सर्व कोंबडी, चिकन, मटण विक्रेते यांच्या दुकानांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, या दुकानात स्वच्छता राखण्याबाबत एक आराखडा युद्धपातळीवर तयार करण्यात येणार आहे. त्याबाबतची स्वतंत्र कार्यप्रणाली सादर करण्याचे निर्देश प्रशासनाने २४ प्रभागातील सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

जर मुंबईत कुठेही मृत पक्षी, कावळा अथवा कोंबड्या आढळून आल्यास त्यांची संपूर्ण तपासणी करण्यात येईल. हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींचे निवारणासाठी आप्तकालीन विभाग , संबंधित सहायक आयुक्त कार्यालयात अथवा पॉट वॉर रुममार्फत कार्यवाही केली जाईल. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने ‘ रॅपीट रिस्पॉन्स टीम’ तयार केली असून यात दोन डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक अभियंताच्या आदेशानुसार कर्मचारी आणि श्रमिक कामगार मृत पक्षांची विल्हेवाट लावतील. तसेच, या मृत पक्षी, कावळे, कोंबड्या यांचे मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी एक शास्त्रोक्त पद्धत ठरविण्यात आली आहे. तसेच मृत पक्षांची विल्हेवाट लावताना जमिनीत खोल खड्डा खोदण्यात यावा. त्या खड्ड्यात त्या मृत पक्षी, कोंबडी, कावळायांना पुरण्यात यावे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात चुनखडीचा वापर करण्यात यावा. तसेच, तो खड्डा भटक्या प्राण्यांमार्फत उकरला जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, बर्ड फल्यूबाबत वीर जिजामाता प्राणिसंग्रहायाने सेंट्रल झू ऑथोरिटीने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. त्याचप्रमाणे, बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव व प्रसाराबाबत पशुवैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आय.ई.सी. अंतर्गत जनजागृती करावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद आहे.


- Advertisement -

हेही वाचा – मुंबई, ठाण्यासह राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव!

 

 

 

- Advertisement -