Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईत हेपेटायटीस आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये घट!

मुंबईत हेपेटायटीस आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये घट!

Related Story

- Advertisement -

जलजन्‍य आजारांच्‍या गेल्‍या ६ वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत मुंबईत या आजारांचे प्रमाण कमी झाल्याची बाब समोर येत आहे. जानेवारी ते नोव्‍हेंबर या ११ महिन्‍यांच्‍या कालावधीत मागील तुलनेत यावर्षी हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ रुग्‍णसंख्‍येत तब्‍बल ८३.६० टक्‍क्‍यांची, तर गॅस्‍ट्रो बाधितांच्‍या संख्‍येत ६८.०४ टक्‍क्‍यांची नोंदविण्‍यात आली असल्याची माहिती महानगरपालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे.

सातत्‍याने हात धुणे, उघडयावरचे अन्‍न न खाणे, कटाक्षाने शुद्ध पाणी पिणे आदी बाबींवर जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृती प्रयत्‍नांना नागरिकांनी देखील अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. त्‍यामुळेच गेल्‍यावर्षी म्‍हणजेच जानेवारी ते नोव्‍हेंबर २०१९ या दरम्‍यान १ हजार ४९४ एवढी असणारी हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ रुग्‍णसंख्‍या यंदा म्‍हणजेच जानेवारी ते नोव्‍हेंबर २०२० याच ११ महिन्‍यांच्‍या कालावधी दरम्‍यान २४५ इतकी झाली आहे. याचाच अर्थ गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत हेपॅटायटीस रुग्‍णसंख्‍येत तब्‍बल ८३.६० टक्‍क्‍यांची घट नोंदविण्‍यात आली आहे. हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ रुग्‍णसंख्‍या ही जानेवारी ते नोव्‍हेंबर २०१५ या दरम्‍यान १ हजार ७५ एवढी होती. याच ११ महिन्‍यांच्‍या कालावधीसाठी सदर रुगणसख्‍ंया सन २०१६ मध्‍ये १ हजार ४२५, वर्ष २०१७ मध्‍ये १ हजार १०५, सन २०१८ मध्‍ये १ हजार ७४ एवढी नोंदविण्‍यात आली होती.

- Advertisement -

जलजन्‍य आजार असणा-या गॅस्‍ट्रो रुग्‍णांच्‍या सख्‍ंयेत देखील गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत लक्षणीय घट नोंदविण्‍यात आली आहे. जानेवारी ते नोव्‍हेंबर २०१९ या ११ महिन्‍यांच्‍या कालावधी दरम्‍यान ७ हजार २४७ रुग्‍ण आढळून आले होते. तर जानेवारी ते नोव्‍हेंबर २०२० या दरम्‍यान २ हजार ३१६ रुग्‍ण आढळून आले. याचाच अर्थ गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत गॅस्‍ट्रो रुग्‍णसंख्‍येत तब्‍बल ६८.०४ टक्‍क्‍यांची घट नोंदविण्‍यात आली आहे. गॅस्‍ट्रो रुग्‍णसंख्‍या ही जानेवारी ते नोव्‍हेंबर २०१५ या दरम्‍यान १० हजार २५७ एवढी होती. याच ११ महिन्‍यांच्‍या कालावधीसाठी सदर रुगणसख्‍ंया सन २०१६ मध्‍ये ९ हजार ४६२, वर्ष २०१७ मध्‍ये ७ हजार ९११, सन २०१८ मध्‍ये ७ हजार ३१५ एवढी नोंदविण्‍यात आली होती.

हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ आणि गॅस्‍ट्रो या दोन्‍ही जलजन्‍य आजारांच्‍या  आकडेवारीनुसार नोव्‍हेंबर २०१९ दरम्‍यान ८ हजार ७४१ रुग्‍ण आढळून आले होते. तर याच कालावधीसाठी यंदाच्‍या वर्षी म्‍हणजेच जानेवारी ते नोव्‍हेंबर २०२० दरम्‍यान २ हजार ५६१ रुग्‍ण आढळून आले आहेत. याचाच अर्थ गेल्‍यावर्षीच्‍या तुलनेत जलजन्‍य आजारांच्‍या रुग्‍णसख्‍ंयेत ७०.७० टक्‍क्‍यांची घट नोंदविण्‍यात आली आहे.

- Advertisement -