घरमुंबईताज हॉटेलला आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर हायअलर्ट

ताज हॉटेलला आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर हायअलर्ट

Subscribe

मुंबई शहरातील बंदोबस्तात वाढ; अतिरिक्त पोलीस पथकाला पाचारण

पाकिस्तानातील कराची स्टॉक एक्सचेंजवर सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काही तास उलटत नाही तोच मुंबईतील सुप्रसिद्ध ताज हॉटेलवर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी एका निनावी कॉलद्वारे देण्यात आली आहे. हा कॉल पाकिस्तानातून आल्याचे बोलले जाते. या धमकीच्या पार्श्वभूमीवर शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला असून पोलीस बंदोबस्तात अचानक वाढ करण्यात आली आहे. कुलाबा आणि वांद्रे येथील ताज हॉटेलसह प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिर, मंत्रालय, विधानसभा तसेच इतर शासकीय-निमशासकीय कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, दहशतवादी हल्ल्याच्या कॉलबाबत गुन्हे शाखा आणि एटीएसकडून संमातर तपास सुरू आहे, हा कॉल नक्की पाकिस्तानात आला की कोणी थट्टामस्करी म्हणून कॉल केला याची शहानिशा सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोमवारी पाकिस्तानाच्या कराची स्टॉक एक्सचेंजवर बलूच लिबरेशन आर्मीने दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्याला काही तास उलटत नाहीतर तोवर सोमवारी मध्यरात्री उशिरा 26/11 सारखा दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी देण्यात आली. कॉल करणार्‍या व्यक्तीने लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा उल्लेख केल्याने हॉटेल प्रशासनाने तातडीने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना ही माहिती दिली. या माहितीनंतर ताज हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातला आहे. तिथे कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. या धमकीनंतर वांद्रे येथील ताज प्रेसिडंटलाही अशाच प्रकारे धमकीचा कॉल आल्याचे बोलले जाते. त्यामुळे तेथील सुरक्षा व्यवस्थेतही प्रचंड वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई शहरात पाक पृरस्कृत अतिरेक्यांकडून घातपात होण्याची शक्यता यापूर्वीच गुप्तचर यंत्रणेकडून मुंबई पोलिसांना देण्यात आली होती, त्यामुळे मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरातील बंदोबस्तात अचानक वाढ करण्यात आली असून तिथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख शासकीय-निमशासकीय कार्यालय, प्रार्थनास्थळांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ताजच्या दहशतवादी हल्ल्याच्या धमकीची गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानंतर सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या धमकीनंतर स्थानिक गुन्हे शाखेसह एटीएसच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळीची पाहणी केली होती, कॉल करणार्‍या व्यक्तीने तो पाकिस्तानातून बोलत असल्याचे तसेच लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा उल्लेख केला होता, त्यामुळे या कॉलची सत्यता पडताळण्यात येत आहे. हा कॉल नक्की पाकिस्तानातून आला की केवळ दहशत निर्माण करण्यासाठी ही धमकी देण्यात आली होती याचा गुन्हे शाखा तसेच एटीएसकडून तपास सुरू आहे. लॉकडाऊनमुळे सध्या हॉटेल्स बंद असली तरी हा संपूर्ण परिसर खाली करण्यात आला आहे. तिथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

ताजजवळील गेटवे ऑफ इंडिया परिसरातही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. समुद्रात बोटींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नाकाबंदी आणि गस्त घाला, संशयित दिसणार्‍या व्यक्तींची चौकशी करा, संपूर्ण खात्री झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला सोडून द्या, असा आदेश वरिष्ठांकडून देण्यात आला आहे. सध्या देशात करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई पोलिसांना करोनाचा मुकाबला करताना शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार याकडेही आता विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. ताजच्या धमकीनंतर सकाळपासून मुंबई शहरात जागोजागाी बंदोबस्त वाढविण्यात आला असून नाकाबंदी सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे दंगल नियंत्रण पथक, धडक कृती दल, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथकासह इतर यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -