घरमुंबईवृत्तपत्रांचे येत्या रविवारपासून घरपोच वितरण!

वृत्तपत्रांचे येत्या रविवारपासून घरपोच वितरण!

Subscribe

उद्धव ठाकरे यांची घोषणा

करोनाच्या काळात ठप्प झालेले घरपोच वृत्तपत्रांचे वितरण आता सुरु होणार असून येत्या रविवारपासून वाचकांना घरी बसून वृत्तपत्र वाचनाचा आनंद घेता येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधताना ठाकरे यांनी राज्यातील जनतेला लॉकडाऊनमधून बाहेर काढताना अनेक महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. त्यात त्यांनी बंद पडलेल्या घरपोच वृत्तपत्र वितरणाचे टाळे सरकार आता उघडत असल्याचे स्पष्ट केले. वृत्तपत्र विक्रेत्यांशी झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

गेले दोन एक महिने वृत्तपत्रांचे घरपोच वितरण बंद झाले होते. त्याचा मोठा परिणाम वृत्तपत्र जगतावर झाला होता. लोकांपर्यंत वृत्तपत्र जात नसल्याने जाहिरातींवर मोठ्या मर्यादा आल्या होत्या. एकूणच वृत्तपत्र व्यवसाय धोक्यात आला होता. भविष्यात त्याचे मोठे परिणाम सहन करावे लागणार, असे वाटत असताना वृत्तपत्रांचे येत्या रविवरपासून घरपोच वितरण होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र घरपोच वृत्तपत्रांचे वितरण करणार्‍या मुलांची काळजी घेतली जाणे तेवढेच महत्वाचे आहे, याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. ’ घरपोच वृत्तपत्र वितरण करणार्‍या मुलांना मास्क लावणे गरजेचे असून त्यांनी आपले हात नीट सानिटीजर केले पाहिजेत’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

राज्यात आता लॉकडाऊन नाही तर ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू करत आहोत. लॉकडाऊन हा शब्द आता केराच्या टोपलीत टाका, आपण पुनश्च हरिओम करत आहोत. मात्र, आयुष्याची नव्याने सुरुवात करताना काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन करतानाच आपण लॉकडाऊनमध्ये ज्या गोष्टी सुरू करत आहोत, त्या गोष्टी पुन्हा बंद होणार नाहीत, त्याची खबरदारी घेऊया, असे ठाकरे म्हणाले.

३ जून, ५ जून आणि ८ जूनपासून आपण काही गोष्टी शिथिल करत आहोत. ३जूनपासून मॉर्निंग वॉकलाही परवानगीही देत आहोत. दुकानेही सुरू होणार आहेत, पण गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. काही देशांनी लॉकडाऊन उठवला, काहींनी लॉकडाऊन लावलाच नव्हता, अशा देशांची स्थितीही आपण पाहिली आहे. त्यामुळे आपल्याकडे असा काही गोंधळ होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

- Advertisement -

येत्या ५ जूनपासून शहरातील दुतर्फा दुकानांना विषम तारखेनुसार सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या दुकानात गर्दी करू नका. मागच्यावेळ सारखा गोंधळ घालू नका. जगासमोर शिस्तबद्धतेचा आदर्श ठेवा. येत्या ८ तारखेपासून सरकारी कार्यालयेही सुरू करण्यात येणार आहे. १० टक्के मर्यादित कर्मचार्‍यांना घेऊन कार्यालये सुरू करणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सभा, संमेलन, सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अंतिम वर्षाच्या मुलांना पास करणार

पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षाला असणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. अंतिम वर्षाच्या मुलांना सेमिस्टरचे सरासरी गुण देऊन पास केले जाणार आहे. मात्र यामुळे काही मुलांचे समाधान होणार नसेल तर त्यांना ऑक्टोबर- नोव्हेंबरला परीक्षेला बसण्याची संधी मिळेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -