घरमुंबईकमीशनर काका...आमची घरे कधी मिळणार

कमीशनर काका…आमची घरे कधी मिळणार

Subscribe

केंद्र सरकारच्या बीएसयुपी योजनेतंर्गत मंजूर झालेल्या घरांचा ताबा दोन वर्षे होऊनही घरे न मिळाल्याने त्या निषेधार्थ कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडजवळील साठेनगर परिसरातील मुलांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. दरम्यान यावेळी त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी पध्दतीने निषेधही व्यक्त केला. केंद्र सरकारच्या बीएसयुपी या योजनेतंर्गत महापालिका क्षेत्रातील अडीच हजार घरे प्रतिक्षेत असल्याचे वृत्त 1 फेब्रुवारीला ‘आपलं महानगर’मध्ये प्रकाशित करून या प्रकरणाला वाचा फोडली होती.

केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणार्‍या बीएसयूपी प्रकल्पामध्ये डम्पिंग ग्राऊंडच्या साठेनगर परिसरातील नागरिकांना घरे मंजूर झाली आहेत. या प्रकल्पांतर्गत उंबर्डे येथे ही घरे बांधण्यात आली असून त्यासाठी लोकांनी पैसेही जमा केले आहेत. मात्र त्याला आता 2 वर्षे उलटूनही अद्याप या घरांचा ताबा संबंधित रहिवाशांना मिळाला नाही. त्यामुळे या परिसरात राहणार्‍या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कचर्‍याचा वाढता डोलारा, अस्वच्छ स्वछतागृह, पावसाळ्यात वस्तीत शिरणारे गुडघाभर पाणी आदी समस्यांना इथल्या रहिवाशांना तोंड द्यावे लागत आहे. घर मंजूर होऊनही अजूनही न मिळाल्याने या परिसरातील राहुल साबळे, प्रिती ढगे , शीला घुले, राजू घुले , पायल वाघमारे प्रथमेश ढगे, अंकुश घुले आदी विद्यार्थ्यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. तत्पूर्वी मुलांनी पालिका आयुक्तांना गुलाब पुष्प भेट देत घरांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मागणी केली.

- Advertisement -

काय आहे बीएसयुपी योजनेची स्थिती
बीएसयुपी योजनेतंर्गत महापालिकेत 13 हजार 864 घरांच्या प्रस्तावाला केंद्र व राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली होती. सुमारे 600 कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प होता. मात्र जागेचा प्रश्न, न्यायालयीन बाबी आदी अनेक अडचणीमध्ये बीएसयुपी प्रकल्प रखडून पडला. अनेक कामेही खोळंबून राहिली आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती कमजोर असल्याने पालिकेने 13 हजार 864 घरे बांधण्याचा लक्ष्य कमी करून 7 हजार 272 घरे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी पालिकेने कशीबशी तीन हजार घरे बांधून पूर्ण केली आहेत. त्यातील एक हजार 478 लाभार्थींना घरे वाटप करण्यात आली आहेत. उरलेली अडीच हजार घरे अजूनही वाटपाच्या प्रतिक्षेत आहेत. महापालिकेकडे लाभार्थींची यादी निश्चित नसल्याने हे वाटप रखडले आहे. तसेच पाच हजार 700 घरे हे 95 टक्के बांधून पूर्ण झालेली आहेत.

महापालिकेने ज्याठिकाणी या लोकांना घरे मंजूर केली असतील त्याठिकाणी यांना निश्चितच घरे उपलब्ध करून दिली जातील. त्यासाठी आवश्यक ती कामे पूर्ण करून येत्या 8 दिवसांत हा प्रश्न सोडवू.
गोविंद बोडके, महापालिका आयुक्त, केडीएमसी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -