प्रामाणिक टॅक्सीचालक शेखने परत केले ७ लाखांचे दागिने

Mumbai

भारतात येणार्‍या विदेशी नागरिकांना टॅक्सी चालकांकडून भाड्याची अधिक रक्कम घेऊन फसवण्यात येत असल्याचे प्रकार घडतात. तसेच परदेशातून येणार्‍या लोकांना चांगली वागणूक द्या, यासाठी सरकारकडून जाहिरातीही करण्यात येतात. पण याच्या पलीकडे जाऊन मोहम्मद शेख या गरीब टॅक्सीचालकाने ‘अतिथी देवो भव’चा प्रत्यय समस्त भारतीयांना दिला. इंग्लंडहून मुंबईत आलेल्या एका महिलेची टॅक्सीत राहिलेली सात लाखांच्या दागिन्यांची बॅग शेख यांनी महिलेला परत केली. याबद्दल पोलिसांंनी त्याचा खास सत्कार केला.

इंग्लंडहून कामानिमित्त ६३ वर्षीय सिमम वोराजी ही महिला मुंबईत आली. आपली बॅग ती टॅक्सीत विसरली. त्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात दाखल केली. दुसर्‍या बाजूला प्रामाणिक टॅक्सीचालकाने त्या महिलेची दागिन्यांची बॅग घेऊन स्वत:च पोलीस ठाणे गाठले. ती बॅग त्याने पोलिसांकडे सुपुर्द केली. टॅक्सीचालक मोहम्मद सीराज शेख याने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचा नागपाडा पोलिसांकडून सत्कार करण्यात आला.

सिमम वोराजी हिने सुरत येथे सात लाखांचे सोन्याचे दागिने खरेदी करून ती मुंबईत आली. १८ नोव्हेंबरला मुंबईत आल्यानंतर सिमम मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून मुसाफिर खाना येथे जाण्यासाठी मोहम्मद सिराज शेख यांच्या टॅक्सीत बसली. मुसाफिर खान्याजवळ ती टॅक्सीतून उतरली. पण दागिन्यांची बॅग टॅक्सीतच विसरली. काही वेळातच आपण बॅग टॅक्सीत विसरल्याचे तिच्या लक्षात आले. पण तोपर्यंत बराच वेळ झाला होता. त्यामुळे सिमम हिने तातडीने एका नागरिकाच्या मदतीने नागापाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

सिमम या आपल्या पाहुण्या असल्याने त्यांची बॅग लवकरात लवकर शोधून देण्यासाठी नागपाडा पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. नागपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळू जाधव यांनी दोन पथके तयार केली. मुंबई सेंट्रल येथून सिमम यांनी टॅक्सी पकडली असल्याने पोलिसांनी तेथून सुरुवात केली. बर्‍याच परिश्रमानंतर पोलिसांना मोहम्मद शेख याच्या टॅक्सीची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. पण त्यापूर्वीच मोहम्मद शेख मौल्यवान दागिन्यांच्या बॅगेसह नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला होता. शेख यांनी बॅगेतला सर्व ऐवज नागपाडा पोलिसांकडे सोपवला. त्यानंतर पोलिसांनी सिमम यांचे दागिने त्यांना दिले. मोहम्मद सिराज शेख (४८) हे १० वर्षांपासून टॅक्सी चालवत आहेत. त्यातून फार कमी उत्पन्न मिळत असले तरी परदेशी महिलेचे मौल्यवान दागिने परत देऊन त्यांनी स्वत:च्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. शेख यांनी दाखवलेल्या प्रमाणिकपणाबद्दल नागपाडा पोलिसांनी त्यांचा सत्कार केला.

सिमम वोराजी यांची तक्रार येताच आम्ही तपासाला सुरुवात केली. टॅक्सीचालक शेख यांनी प्रामाणिकपणा दाखवत बॅग आणून दिल्याने आम्ही कमी वेळेत दागिन्यांची बॅग सिमम यांना परत करू शकलो.
-संतोष बागवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नागपाडा पोलीस ठाणे.

१८ नोव्हेंबरला सिमम वोराजी यांनी माझ्या गाडीतून मुसाफिर खानापर्यंत प्रवास केला. त्यावेळी त्या गाडीतच बॅग विसरून गेल्या. सिमम या गाडीतच बॅग विसरल्या असल्याचे लक्षात येताच मी तातडीने जवळच असलेल्या नागपाडा पोलीस ठाण्यात गेलो. परंतु पोलिसांनी त्या बॅगचा तपास आधीपासूनच सुरू केला होता हे माझ्या पोलीस ठाण्यात गेल्यावर लक्षात आले. त्यामुळे सिमम यांना लगेचच बॅग परत देण्यात यश आले. या गोष्टीचे मला खूप समाधान वाटत आहे.
– मोहम्मद सिराज शेख, टॅक्सीचालक, मुंबई सेंट्रल