मुंबई महापालिकेचे वरातीमागून घोडे; दिवाळी झाल्यानंतर आरोग्यसेविकांना भाऊबीज भेट

महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर बुधवारी भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेत पालिकेने त्यांचा कारभार म्हणजे वरातीमागून घोडे असल्याचे दाखवून दिले.

aarogya sevika

कोरोना योद्धा म्हणून ज्यांच्या संपूर्ण शहराने गौरव केला, अशा आरोग्य सेविकांना 4400 रुपये भाऊबीज भेट देण्याचा निर्णय 2 नोव्हेंबरला महापालिकेने जाहीर केला. दिवाळी संपली तरीही त्यांना भाऊबीज भेट व वेतनही दिले नसल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर बुधवारी भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेत पालिकेने त्यांचा कारभार म्हणजे वरातीमागून घोडे असल्याचे दाखवून दिले.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गाजावाजा करत आरोग्यसेविकांना 4400 रुपये भाऊबीज भेट देण्याचा निर्णय जाहीर केला. मुळातच तुटपुंजी असलेली भाऊबीज भेट मिळण्यासाठी आरोग्यसेविकांना दिवाळी संपण्याची वाट पाहावी लागली. एकीकडे भाऊबीज भेट दिली नसताना पालिकेने ऑक्टोबरचे वेतनही दिले नाही. कोरोना लढ्यात घरोघरी जाऊन आरोग्यसेविकांनी कोरोना रुग्णांना कोविड सेंटरमध्ये नेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेमध्येही आरोग्यसेविकांनी घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण केली. कोरोना संक्रमणाविरोधात लढणार्‍या आरोग्यसेविकांना महापौरांनी मोठा गाजावाजा करत यंदा 4400 रुपये भाऊबीज भेट देण्याचे जाहीर केले. मात्र त्याला 15 दिवस उलटले तरी त्यांच्या झोळीत ना भाऊबीज भेट, ना ऑक्टोबरचे वेतन त्यामुळे आरोग्यसेविकांची व्यथा फारच बिकट झाली होती. भाऊबीज भेट व वेतनही वेळेवर न देण्यात आल्याने आरोग्यसेविकांमध्ये नाराजी पसरली आहे. पालिकेच्या या कृतीचा आरोग्यसेविकांकडून निषेध व्यक्त करण्यात आल्याची माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी दिली.

आरोग्यसेविकांना दरवर्षी भाऊबीज झाल्यानंतरच भाऊबीज भेट देण्यात येते. त्यामुळे भाऊबीज भेट दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने माजी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना विनंती केली होती. त्यांनी मागणी मान्य करत तसे आदेश पालिकेच्या आरोग्य विभागाला दिले. मात्र त्याच्या अंमलबजावणीकडे आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.