घरCORONA UPDATEपावसाळ्यात कोरोनाचं काय होईल? वाचा तज्ज्ञ डॉ. अविनाश सुपेंची मुलाखत!

पावसाळ्यात कोरोनाचं काय होईल? वाचा तज्ज्ञ डॉ. अविनाश सुपेंची मुलाखत!

Subscribe

भारतामध्ये कोरोनाची साथ पसरत असताना अनेकांकडून उन्हाळ्यामध्ये कोरोना टिकणार नाही असे छातीठोकपाने सांगण्यात येत होते. परंतु प्रत्यक्षात उन्हाळ्यामध्येच मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले. त्यामुळे आता पावसाळ्यात काय होणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पावसाच्या पाण्यात कोरोनाचे विषाणू वाहून जाणार का? कोरोनाचा फैलाव अधिक होणार का? अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. या प्रश्नांची उकल करण्यासाठी आणि पावसाळ्यात नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत राज्य सरकारने कोरोनाबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी मुंबईसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आणि केईएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्यासोबत ‘आपलं महानगर’ने साधलेल्या संवादाचा हा सारांश…

प्रश्न : उन्हाळ्यामध्ये कोरोना टिकणार नाही असे म्हटले जात होते, पण तसे घडले नाही, पावसाचा कोरोनावर काही परिणाम होईल का?

- Advertisement -

उत्तर : पावसात कोरोनाचे विषाणू वाहून जातील याला काहीच शास्त्राधार नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये. पावसाळ्यात कोरोना कसा वागेल याबाबत काहीच सांगता येणं कठीण आहे. कोरोना डिसेंबरमध्ये सुरु झाला आहे. त्यामुळे कोणत्याच देशामध्ये पावसाळ्यात काय होईल याची काहीच कल्पना नाही. कोरोनाचे जे जंतू आहेत ते साधारणपणे थुंकीतून जातात. त्यामुळे ते वाहून जातील अशी एक कल्पना आहे. परंतु चेहऱ्यावर किंवा जे बाहेर पडणारे जंतू आहेत ते तसेच राहणार आहेत. त्यामुळे लोकांनी पावसाळ्यात मास्क वापरताना फक्त ओला मास्क वापरू नये.

प्रश्न : पावसाळ्यात आरोग्य सेवेवर दुहेरी ताण पडेल का?

- Advertisement -

उत्तर : पावसाळ्यातल्या आजारांमुळे थोडा आरोग्य सेवेवर ताण पडेल. पाऊस पडल्यानंतर काही दिवसांनी जूनच्या शेवटला लेप्टो सुरु होतो. त्यानंतर जुलैमध्ये मलेरिया जास्त दिसतो. साधारणतः श्रावण संपला की डेंग्यू सुरु होतो. त्यावेळी पावसाचे प्रमाण कमी होते. पहिल्या दोन महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. ज्यावेळी पाणी साठायला लागते तेव्हा डेंग्यू सुरु होतो. तोपर्यंत कोरोनाचा भार कमी झाला तर आपल्या आरोग्य सेवेवर तेवढा ताण येणार नाही. नाहीतर हा दुहेरी ताण येईल. कोरोना आटोक्यात आला नाही तर एकाचवेळी नॉन कोविड बेड फुल होतील आणि मग मेडिकल गोष्टींवर खूप ताण पडतो. आतापर्यंत लोकं नॉन इमर्जन्सी पकडून होते. पण आता लोक हळूहळू बाहेर पडू लागले आहेत. कारण त्याच्यावरही त्यांना औषधे लागतात. त्याचा विचार करून ट्रीटमेंटची व्यवस्था करायला पाहिजे. आणि औषधोपचार सुरळीत करायला पाहिजेत.

प्रश्न : पावसाळ्यामध्ये नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?

उत्तर : लोकांनी मास्क वापरणे गरजेचे आहे, पण त्याचबरोबर डोक्यावर प्लॅस्टिकची टोपी घालावी. जेणेकरून मास्क ओले होणार नाहीत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओल्या मास्कमुळे जास्त त्रास होऊ शकतो. सुके मास्क वापरावेत. एखादा अतिरिक्त मास्क ठेवावा. एक ओला झाला तर दुसरा वापरता येऊ शकतो. छत्री दररोज पुसून घेतली पाहिजे. कारण छत्रीमधून जंतू पसरू शकतात. आपण छत्री हातात घेऊन फिरतो आणि ऑफिसमध्ये ती आपण अनेक छत्र्यांसोबत ठेवतो. त्यामुळे ती पुसून घ्यावी. ती काळजी घ्यावी.

प्रश्न : लोकांना काय सल्ला द्याल?

उत्तर : चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यामध्ये स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि स्क्रीनिंग करणे या महत्वाच्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. ऑफिस, ट्रेन, बस, दुकानं सर्व ठिकाणी या गोष्टी पाळल्या पाहिजेत. पावसात या चारही गोष्टींचे पालन केले तर आपण बऱ्यापैकी नियंत्रण मिळवू शकू. लोक नेमके इथेच बेफिकिरी करत असतात. ते टाळले पाहिजे.

प्रश्न : पावसाळ्यात पालिकेसमोर कोणते आव्हान असणार आहे?

उत्तर : आपल्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. तापाची आणि कोविडची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे आपल्याला त्या दोन्हींचा विचार करावा लागणार आहे. मलेरिया, डेंग्यूच्या चाचण्या ताबडतोब कशा करता येतील याबाबत पालिकेकडून तयारी सुरु आहे. पालिकेकडून पावासाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी सर्व तयारी करण्यात येते. यावेळी कोविडमुळे थोडी अडचण येण्याची शक्यता आहे. पूर्वी दर रविवारी तापाचे कॅम्प घेत असतो ते यावेळी घेता येणार नाहीत. कोविडमुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार नसल्याने कॅम्प घेण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -