घरमुंबईवांद्रे टर्मिनसबाहेर उसळली गर्दी

वांद्रे टर्मिनसबाहेर उसळली गर्दी

Subscribe

तिकीट नसलेले मजूरही झाले गोळा,पोलिसांचे लगेचच गर्दीवर नियंत्रण

पुन्हा एकदा सर्व नियम डावलून स्थलांतरित मजुरांनी वांद्रे टर्मिनसबाहेर श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून गावी जाण्यासाठी गर्दी केल्याची घटना समोर आलेली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे वांद्रे टर्मिनसबाहेर काही प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या मजुरांच्या गर्दीला पांगविण्यासाठी रेल्वे प्रशासनाला आणि पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागली. मात्र पोलीसी खाक्या दाखवून काही मिनिटांमध्येच पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणली.

मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिनसवरून बिहारसाठी विशेष श्रमिक ट्रेन सुटणार होती. या ट्रेनसाठी १ हजार ७०० प्रवाशांनी नोंदणी केली होती. नोंदणीकृत श्रमिक-मजूर सकाळी ११ वाजल्यापासून वांद्रे टर्मिनसवर गोळा झाले होते. रेल्वे प्रशासनाकडून नोंदणीकृती श्रमिक प्रवाशांची सर्व प्रकारची तपासणी करून रेल्वे स्थानकाच्या आत त्यांना प्रवेश देण्यात येत होता. मात्र नोंदणी नसलेले शेकडो प्रवासी वांद्रे टर्मिनसवर जमा झालेले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकाबाहेर एक प्रकारचा गोंधळ उडालेला होता.

- Advertisement -

परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर पोलिसांनी गर्दी करू नका म्हणून मजुरांना विनंती केली. मात्र रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी वाढतच होती. तेव्हा मात्र पोलीसी खाक्या दाखवून काही मिनिटांतच पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले होते. यापूर्वी सुद्धा १४ एप्रिल २०२० रोजी अशाच प्रकारची गर्दी वांद्रे पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेर झाली होती. पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता. तसेच अनेकांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते.

पश्चिम रेल्वेचे आवाहन
सध्या स्टेशनवरील सर्व तिकीट काऊंटर बंद असल्याने कोणतेही तिकीट मिळत नाही. श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी दिली जाते. त्यामुळे लोकांनी कोणत्याही कारणाशिवाय रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी करू नये, असे आवाहनही पश्चिम रेल्वेने ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

- Advertisement -

नोंदणीकृत प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर बोलाविण्यात आले होते. परंतु नोंदणी न केलेले आणि त्यांना कॉल न आलेले बरेच नागरिक रेल्वे स्थानकाच्या बाहेर रस्त्यावर आणि पुलावर जमले होते. आम्ही नोंदणीकृत १७०० प्रवाशांची तपासणी करून त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची परवानगी दिली. त्यानंतर दुपारी १२ वाजता श्रमिक ट्रेन सोडण्यात आली आहे. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने जमा झालेल्या प्रवाशांना परत पाठविण्यात आले आहे.
-रविंद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -