घरमुंबईहॅम्बोल्ट पेंग्विनमुळे मु्ंबई महापालिकेचा फायदा!

हॅम्बोल्ट पेंग्विनमुळे मु्ंबई महापालिकेचा फायदा!

Subscribe

राणीबागेतल्या हॅम्बोल्ट पेंग्विनमुळे पालिकेला दिवाळीत मोठा आर्थिक नफा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पेंग्विन प्रकरणावरून मुंबईच्या राजकारणात मोठा वाद पाहायला मिळाला होता.

सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे पर्यटकांनी राणीच्या बागेत गर्दी वाढवली आहे. या बागेत हॅम्बोल्ट पेंग्विन आल्यापासून त्यांना पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत. हे पेंग्विन पाहाण्यासाठी दिवाळीदरम्यान ६ हजाराहून अधिक पर्यटकांनी राणी बागेला भेट दिली आहे. तर दोन दिवसांत २ लाख ३० हजार रुपये मुंबई महानगरपालिकेच्या खात्यात जमा झाले आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कसे आले राणीबागेत पेंग्विन?

मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणी बागेमध्ये शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार दक्षिण कोरियामधून २६ जुलै २०१६ रोजी ८ हॅम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले. त्यापैकी एका मादी पेंग्विनचा दोनच महिन्यात मृत्यू झाला होता. राणी बागेत सध्या ३ नर, तर ४ मादी पेंग्विन आहेत. हे पेंग्विन बघायला पर्यटक गर्दी करत असल्याने पेंग्विनच्या देखरेखीवरील खर्च वाढत आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून प्रवेश शुल्कात देखील वाढ करण्यात आली होती. राणी बागेच्या शुल्कात वाढ केल्याने पर्यटक पाठ फिरवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शुल्कवाढीनंतरही पर्यटकांची गर्दी कायम आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होते. राणी बागेत दररोज पर्यटकांची रीघ लागलेली असते.

- Advertisement -

मादी पेंग्विनच्या मृत्यूचं राजकारण

दोनच महिन्यांत मादी पेंग्विनचा मृत्यू झाल्यामुळे मुंबईच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला होता. शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आग्रहानंतर भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयामध्ये पेंग्विन आणण्यात आले होते. त्यामुळे, या वादामध्ये सर्वाधिक टीका ही शिवसेनेवर होत होती. तसेच, या पेंग्विनला ठेवण्याच्या टँकला तडे गेल्याची दृश्य काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर ही टीका शिगेला पोहोचली होती. मुंबईचं वातावरण पेंग्विनसाठी योग्य नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -