घरमुंबईभिवंडीत बोगस रिक्षांचा सुळसुळाट; विनापरवाना रिक्षा चालकांची मनमानी

भिवंडीत बोगस रिक्षांचा सुळसुळाट; विनापरवाना रिक्षा चालकांची मनमानी

Subscribe

भिवंडी शहरातील विविध रस्त्यांवर विना परवाना, आवश्यक कागद पत्र, प्रवासी वाहन चालविण्याचे लायसन्स आणि बॅच नसताना देखील बेकायदेशीरपणे रिक्षा चालवत आहेत. तसेच हे रिक्षा चालक मनमानी करत प्रवाशांची लूट करत असल्याचे समोर आले आहे.

भिवंडी शहरातील विविध रस्त्यांवर विना परवाना, आवश्यक कागद पत्र, प्रवासी वाहन चालविण्याचे लायसन्स आणि बॅच नसताना देखील बेकायदेशीरपणे शहरात सुमारे २० हजार रिक्षा शहरात धावत आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालक बेकायदेशीर असल्याने या रिक्षा चालकांच्या अरेरावी आणि मनमानीमुळे प्रवासी वर्ग त्रस्त झाला आहे. मात्र, याप्रकरणी वाहतूक पोलीस आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून देखील कारवाईसाठी मूक भुमिका घेत आहेत. त्यामुळे महिला, विद्यार्थी आणि कामगार प्रवासी हैराण झाले आहेत.

स्थानिक वाहतूक शाखेसह परिवहन विभागाची बघ्याची भूमिका

भिवंडी शहर परिसरात सुमारे २० हजाराहून अधिक बोगस प्रवासी रिक्षा चालत आहेत. तर शहरात फक्त आठ हजार अधिकृत परमिट धारक रिक्षा चालवत आहे. तसेच मीटर पद्धतीने रिक्षा भाडे न आकारता मनमानीपणे थेट शेअर भाडे प्रवाशांकडून घेतले जात असल्याचे देखील समोर आले आहे. यावरून प्रवासी आणि बोगस रिक्षा चालकांमध्ये नेहमीच खटके देखील उडत असतात. मात्र स्थानिक वाहतूक शाखेसह परिवहन विभाग फक्त बघ्याची भूमिका करतात. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालून या मुजोर रिक्षा चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक प्रवासी संघाकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रवाशांची लूट

रिक्षामध्ये तीन प्रवाश्यांची वाहतूक करण्याची मान्यता असताना देखील पाच ते सहा प्रवासी कोंबून बसवण्यात येतात. हा प्रकार भिवंडी एसटी स्टॅन्ड, धामणकर नाका, वंजारपटीनाका, शांतीनगर, पाईपलाईन, कल्याण नाका, अंजूरफाटा, मंडई, नझराना, तीनबत्ती, दर्गा रोड अशा विविध भागात होत असल्याचे समोर आले आहे. अनेकवेळा प्रवाशांकडून १० रुपयांऐवजी १५ ते २० रुपये भाडे घेतले जात आहे. तसेच भिवंडी एसटी आगाराच्या बाहेर तसेच महापालिका प्रवेशद्वार, मिरॅकल मॉल आदी ठिकाणी रस्त्यावरच मनमानीपणे आणि वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवून रिक्षा उभ्या केल्या जातात. त्याचप्रमाणे त्या रिक्षा बाजूला करण्यासाठी सांगितले तर मुजोर रिक्षा चालक त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न करतात.

भिवंडीत वाहतूक कोंडी

भिवंडीत विविध रस्त्यावर भंगार दुकानधारकांची वाहने, स्कुल बस, ट्रांन्सपोर्टचे ट्रक, खासगी गाड्या रस्त्यावर रात्रंदिवस उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच शहरातील विविध भागात रस्त्यांची कामे सुरु असल्याने पालिका प्रशासन आणि पोलिसांनी वाहतूकीचे नियोजन केले नसल्याने शहरात नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. भिवंडीतील शेकडो मुजोर रिक्षा चालकांच्या परमिटची मुदत संपलेली आहे. तर बहुसंख्य रिक्षांच्या पासिंग देखील झालेल्या नाहीत.

- Advertisement -

बेकायदेशीर रिक्षा चालकांकडून ट्रॅफिक पोलिसांना दरमहा हफ्ता दिला जात असल्यानेच त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असा आरोप ज्येष्ठ नागरिक प्रवासी संघाकडून करण्यात आला आहे. तसेच कागदपत्र नसतानाही बेकायदेशीरपणे पाण्याचे टँकर, ट्रक आणि खाजगी बस भिवंडीत राजरोसपणे चालत असून रोजचे अपघात होत आहेत. तरीसुद्धा पोलीस आणि परिवहन अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -