घरमुंबईहोर्डिंग्जमुळे गुदमरतेय मुंबई

होर्डिंग्जमुळे गुदमरतेय मुंबई

Subscribe

मुंबईत बेकायदेशीररित्या उभारलेले आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे मंडप आणि होर्डिंग्ज काढून टाकावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने देऊनही सर्रास शहरात याचे उल्लंघन होताना दिसत आहे. मुंबईत ठिकठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग्जचे पेव फुटल्याचे दिसत आहे. यामध्ये सगळ्यात जास्त होर्डिंग्ज आणि पोस्टर्स राजकीय पक्षांची आहेत. मात्र यावर कधीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा सरकारी महसूल बुडत आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा होर्डिंग्जवरुन राजकीय पक्षांना झापले होते. मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून होर्डिंग्ज लावण्यात आले. त्यामुळे मुंबापुरीची होर्डिंग्जपुरी झाल्याचे भेसूर चित्र दिसत आहे.

गणपतीपासून पोस्टरबाजी कायमच
चेंबूरमध्ये गणपती उत्सवापासून ते थेट आता दिवाळीपर्यंत प्रत्येक चौकात विविध पक्षांचे आणि सार्वजनिक मंडळाचे स्वागतद्वार, कमानी, होर्डिंग्ज आणि स्वागताचे पोस्टर्स किंवा बॅनर्स लावण्यात आले. याठिकाणी अनेक पोस्टर्स गणेशोत्सवाचे असून अद्याप ते काढून टाकण्याची तसदी मंडळांनी आणि राजकीय पक्षांकडून घेण्यात आलेली नाही. एकीकडे न्यायालयाकडून पोस्टरबाजी करण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. तरीदेखील याठिकाणी राजकीय पुढार्‍यांकडून स्वतःची जाहिरात करण्यासाठी पक्षांच्या कार्यकर्त्यांना राबविले जात आहे. होर्डिंग्ज विनापरवानगी उभारण्यात येऊ नये, असे न्यायालयाने बजावले आहे. याची जबाबदारी न्यायालयाने महापालिका आणि पोलीस आयुक्तांवर टाकली आहे. मात्र आपली जबाबदारी पार पाडण्यात महापालिका आणि पोलीस अपयशी ठरल्याने चेंबूरच्या कानाकोपर्‍यात बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनर्स लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चेंबूर परिसरात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या होर्डिंग्ज आणि पोस्टर्सचा भडीमार झाला असून त्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे. या भागात नेहमीच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पोस्टरबाजी होत असते.

- Advertisement -

बोरिवली पोस्टरबाजी
बोरिवलीच्या नॅशनल पार्क ब्रीजवर शिवसेनाकडून दिवाळीनिमित्त मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ज्यात घ्या गोड साखरेचा मेवा… सदैव आशीर्वाद ठेवा, अशा तर्‍हेेने स्वस्त साखरेची जाहिरात करण्यात आली आहे. ज्यात सेनेच्या आमदारांचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. तर बोरिवली नॅशनल पार्क जवळ सरकारी जागेत भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांचे मोठमोठे होर्डिंग्ज आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सीएम चषक क्रीडा कला व महोत्सवाच्या जाहिरातीही मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्या आहेत. त्यासाठी पालिकेची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही.

राजाराणी चौक दादर
दादर म्हटले तर या क्षेत्राला एक राजकीय वर्तुळ आणि महत्त्व प्राप्त होते. शिवसेना भवन असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान. त्यामुळे याठिकाणी कार्यकर्त्यांची भाऊगर्दी या ठिकाणी होत असते. तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष दादरकडे लागलेले असते. त्यामुळे याचाच फायदा उचलण्यासाठी राजकीय पक्षांकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. तर सध्या पक्षांकडून आपली भूमिका स्पष्ट करतानाच एकमेकांवर टीका करण्यासाठीदेखील विविध होर्डिंग्जचा वापर करण्यात येत आहे. ज्यात शिवसेना आणि मनसेबरोबरच आता भाजपादेखील मैदानात उतरली आहे. याठिकाणी सर्वत्र होर्डिंग्ज लावून बिनदिक्कतपणे न्यायालयाच्या नियमांचे उल्लघंन केल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

न्यायालयाच्या आदेशाला राजकीय नेत्यांची केराची टोपली
शहरातील रस्ते आणि नाक्यांवरील बेकायदा होर्डिंग्ज, पोस्टर्स विरोधात न्यायालयाने आदेश दिले आहेत. मात्र वाहतूक विभाग आणि महानगर पालिकांकडून या नियमांची अंलबजावणी होताना दिसत नाही. कारण हे पोस्टर्स राजकीय पक्षांचे असल्यामुळे महापालिका प्रशासन आणि वाहतूक विभाग कारवाई करण्यास धजावत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाला राजकीय नेत्यांनीच केराची टोपली दाखवली असे सध्या निदर्शनास येत आहे.

शिवडीमध्ये खासगी पोस्टर्स
एकीकडे राजकीय पक्षांच्या होर्डिंग्जनी मुंबईचे विद्रुपीकरण केलेले असताना इतर सामाजिक संस्थांकडूनदेखील न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसत आहे. शिवडी परिसरात असे चित्र दिसून येत आहे. शिवडी येथे सरस फाऊंडेशनने कार्तिकी एकदशी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी जागोजागी पोस्टर्स लावण्यात आले. त्यांनी तर राजकीय पक्षांवर वरताण केली आहे. त्यांनी राजकीय पक्षांच्या पोस्टर आपले पोस्टर्स चिकटवले आहेत.

सिग्नल आणि वाहतूक नियमांना अडथळा
मुंबईत अनेक ठिकाणी कोणत्याही नियमांचे पालन न करताना होर्डिंग्ज लावण्यात येतात. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो. मुंबईसह माटुंगा आणि इतर ठिकाणी सिग्नल यंत्रणा होर्डिंग्जमुळे झाकोळून गेली आहे. त्यामुळे वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. माटुंगा परिसरात अनेक ठिकाणी दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तसेच स्वस्त दरात साखर विक्री करण्यात येत असल्याची माहिती देणारे भरमसाठ पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

प्रभादेवी धमनील नाका

मुंबईत सध्या विविध निमित्ताने लावलेले होर्डिंग्ज दिसून येतात. यामध्ये राजकीय पक्षांच्या होर्डिंग्जचा प्रामुख्याने समावेश आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने ही बॅनरबाजी केली जात आहे. प्रभादेवी परीसरात भाजप,शिवसेना आणि मनसे या पक्षांचे बॅनर्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. शिवसेनेचे प्रभाग क्रमांक १९९४ चे नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या फोटोसहित या परिसरात अनेक ठिकाणी बॅनर्स लागले आहेत. सणाच्या निमित्ताने देण्यात येणार्‍या शुभेच्छा असोत किंवा वाढदिवस असो या परिसरात हे बॅनर्स लावले जातात. यासोबतच माहिम विधानसभा मतदारसंघाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष ऋषिकेश शिळिमकर यांच्या नावाने प्रभादेवी परिसरात दीपावली शुभेच्छांसाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर पंतप्रधांनासोबतच भाजपच्या दिग्गज नेत्यांचे फोटो आहेत. दिवाळी सणानिमित्त साखर, रवा आणि मैदा हे पदार्थ फक्त तीस रुपयांत प्रती किलो या दराने विकले जाणार असल्याचीही जाहिरात करण्यात आली आहे.

पक्षांच्या प्रचारासाठी अशा प्रकारच्या जाहिराती बॅनरच्या माध्यमातून करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. तसेच प्रभादेवीला लागूनच असणार्‍या उड्डाणपुलाखाली सिग्नलजवळसुद्धा मनसेने बॅनर्स लावले आहेत. दीपावलीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक पक्षांनी जागा मिळेल तिथे बॅनर्स लावायला सुरुवात केली होती. यामध्ये सिग्नलजवळची जागासुद्धा मनसेने सोडली नाही. उड्डानपुलांखाली सजावट करुन तो परिसर सुंदर बनवण्याचे काम सुरू असातानाच अशाप्रकारे बॅनरबाजी करून त्याचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे.

प्रतीक्षा नगरमध्ये होर्डिंग्जचे भडीमार
सायन येथील प्रतीक्षा नगर परिसरातही होर्डिंग्ज मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी होर्डिग्ज लावण्यात आलेली आहेत. तर त्याचबरोबर स्थानिक मंडळे आणि संस्थांकडूनही भरमसाठ होर्डिंग्ज आणि बॅनरबाजी सुरू आहे. या बॅनर्सची उंचीही खूप मोठी असून त्यातून पक्षांमध्ये अटीतटीची स्पर्धा रंगलेली दिसत आहे.

विद्रुपीकरण वाढले 
ठाण्याला स्मार्ट सिटी बनविण्याचे स्वप्नं एकीकडे पाहिले जात असतानाच दुसरीकडे मात्र राजकीय पक्षांकडूनच शहर विद्रुपीकरण करण्यात येत आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली परिसरात ऐन दिवाळीत शुभेच्छा देणार्‍या विनापरवाना होर्डिंग्जबाजीला उत आला होता. मात्र पालिकेला सहा दिवस सुट्टी असल्याने कारवाई करणार कोण ? असाही प्रश्न निर्माण झाला होता. शहर विद्रुप करणा-या बेकायदा होर्डिंगबाजीला आळा घालण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र या आदेशाला हरताळ फासण्यात आला. बॅनरबाजीमुळे विद्रुपीकरणात भर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरातील चौकाचौकात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स नेहमीच झळकत असतात, मात्र त्याचबरोबरीने सण उत्सवानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देणा-या शुभेच्छुकांची संख्या मोठी आहे. बसथांबे विजेचे खांब रस्त्याच्या कडेला असणा-या भिंती आणि मिळेल त्या रिकाम्या जागांवर चिकटवले जाणारे बॅनर्स आणि होर्डिंग्जची संख्या दिवसागणिक वाढत आहे. निवडणुका तोंडावर आल्याने नवनवीन चेहरेदेखील त्या निमित्ताने बॅनरवर झळकू लागले आहेत. मात्र एकदा लावलेले बॅनर्स वाढदिवस झाल्यानंतर अथवा सण उत्सव पार पडल्यानंतरही तसेच्या तसेच असतात. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात आणखीनच भर पडते. विनापरवाना होर्डिंग्ज आणि बॅनरवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र त्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जणूकाही स्पर्धाच लागली होती की काय असं चित्र ठाणे आणि कल्याण डेांबिवली, परिसरात पाहावयास मिळाले.

शहरातील चौक असो वा नाका प्रत्येक ठिकाणी राजकीय पक्षांच्या शुभेच्छांचे बॅनर झळकत होते. डोंबिवलीतील घरडा सर्कल, इंदिरा गांधी मानपाडा रोड कल्याणातील शिवाजी चौक आधारवाडी चौक तर ठाण्यातील तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन आदी परिसरात मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले होते. राजकीय पक्षांच्या बॅनरबाजीमुळे चौक पूर्णपणे झाकोळून गेला होता. तसेच प्रत्येक नगरसेवकानेही आपापल्या प्रभागात बॅनर्स लावले होते. या बॅनरबाजीमुळे शहरातील विद्रुपीकरणात आणखीनच भर पडली. दिवाळीनिमित्त सलग सहा दिवस पालिकेला सुट्टी असल्याने बॅनर्सवर कारवाई होऊ शकली नाही. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही पालिका प्रशासनाकडून आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पालिकेची परवानगी न घेता होर्डिंग्ज किंवा जाहिरात फलक लावणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र पालिकेककडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. पालिकेतील सत्ताधारी पक्षाचेच बॅनर्स मोठ्या प्रमाणावर लागलेले असतात. पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथकही राजकीय नेत्यांच्या बॅनरबाजीवर कारवाई करताना हात आखडता घेत आहे. त्यामुळे शहर विद्रुपीकरण करणा-यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने देऊनही पालिका प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

बेकायदा होर्डिंग्ज ओळखायचे कसे?
जे होर्डिंग परवागी घेऊन लावले जातात, त्या होर्डिंगवर त्याचा परवानगी क्रमांक, तो उभारण्यासाठीचा पालिकेने मंजूर केलेला कालावधी नमूद केलेला असतो. तर, अधिकृत फ्लेक्सवरही अशा प्रकारचा क्रमांक असतो. हा क्रमांक असलेले होर्डिंग्ज, फ्लेक्स वैध मानले जातात. पण सध्याच्या घडीला मुंबईत जे होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. त्यातील अर्ध्यापेक्षा अधिकांवर असा कोणताही परवानगी क्रमांक दिसून येत नाही.

काय म्हणते आकडेवारी
गेल्या दहा महिन्यांत कारवाई करून पाडण्यात आलेले होर्डिंग्ज – 7110
अजूनही शिल्लक असलेले अनधिकृत होर्डिंग्ज – 1,310
पोलीस ठाण्यात तक्रार – 504
खटले दाखल – 655
ही आकडेवारी दिवाळीपूर्वीची असून दिवाळीत मुंबईत मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावण्यात आलेले आहेत.

(संकलन – सौरभ शर्मा, विनायक डिगे, नितीन बिनेकर, कृष्णा सोनारवाडकर, संतोष गायकवाड)
  फोटो – संदीप टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -