आधी पत्नीची केली हत्या, मग स्वत:च पोलिसांना कळवलं!

पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर त्यानेच पोलिसांना हत्येची माहिती दिली.

Ambarnath
18 Stall owners arrested from mahalaxmi race course
अटक

पत्नीसोबत वारंवार होणाऱ्या भांडणांना कंटाळून एका व्यक्तीन पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पतीने हत्या केल्यानंतर स्वत:च पोलीस स्टेशनला फोन करून हत्या केल्याचं सांगितलं आणि वर पोलिसांना त्वरीत घटनास्थळी दाखल होण्याची देखील विनंती केली. या प्रकारामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण असून पोलिसांनी संबंधित आरोपी नवऱ्याला अटक केली आहे.

पारा चढला, गळा आवळला

४१ वर्षांचा दीपक भोई पत्नी रुपाली, एक मुलगी आणि एका मुलासह अंबरनाथ पूर्वच्या पालेगाव रिलायन्स रेसिडेन्सी परिसरात राहात होता. घरातल्या किरकोळ कारणांवरून रुपाली आणि दीपक यांच्यामध्ये वारंवार भांडणं होत होती. या भांडणांना दीपक फारच वैतागला होता. बुधवारी देखील दुपारच्या सुमारास या दोघांचे अशाच कुठल्यातरी गोष्टीवरून भांडण झाले. भांडणामध्ये दीपकचा संताप अनावर झाला आणि त्यानं रुपालीच्या ओढणीने तिचा गळा आवळला. यामध्ये रुपालीचा जागीच मृत्यू झाला.


हेही वाचा – मुलीची छेड काढल्यामुळे वडिलाने केली मुलाची हत्या

‘मी हत्या केलीये, लगेच या’

पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर दीपकने लगेच शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये फोन करून ‘मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे, तुम्ही लगेच या’, असं सांगितलं. स्वत: मारेकरीच फोन करून सांगतोय म्हटल्यावर ठाणे अंमलदार स.पो.उपनि.जी.आर. बागल यांनी व.पो.नि. मनजितसिंह बग्गा यांच्यासह पोलीसपथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले. रुपालीच्या मृतदेहाची पाहणी करून उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. तसेच, दीपकला ताब्यात घेण्यात आले. नंतर पो.उप.नि. राकेश डांगे यांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन दीपक भोई याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.