शिवसेनेचाही मीच मुख्यमंत्री

Mumbai
Devendra Fadnavis

मी एकट्या भाजपचा मुख्यमंत्री नाही शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे, असे सांगतानाच, विधानसभा निवडणूक युतीतच लढणार आहोत. त्यासाठी जागावाटप लवकरच होईल. त्यामुळे निवडणुकीबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत भाजपा विशेष प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीचा समारोप करताना केले.
फडणवीस पुढे म्हणाले की, आपल्या सर्वांच्या मेहनतीने ५ वर्षापूर्वी पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री बनू शकला. ज्या कार्यकर्त्यांना काहीही मिळाले नाही आणि ज्यांनी कधी कोणती अपेक्षा सुद्धा केली नाही, ते कार्यकर्ते आज खरे अभिनंदनास पात्र आहेत. हे यश त्यांचे खरे यश आहे. माझ्याकडे गमावण्यासारखे सुद्धा काहीच नाही. ना कोणता कारखाना, ना कोणती संस्था. त्यामुळे केवळ जनतेसाठी काम करणे सोपे झाले. आरक्षण, संरक्षणाचे प्रश्न सोडवू शकलो, शेतीतील अस्वस्थता कमी करू शकलो, अनेक आंदोलने झाली, पण त्यावर समर्थपणे तोडगा काढू शकलो ते केवळ यामुळेच! जे कोणत्या सरकारला जमले नाही, ते आपल्या सरकारला जमू शकले.

पूर्वी दुष्काळ हा काही लोकांसाठी सुकाळ होता, पण आपण मदत करताना गैरप्रकार होऊ दिला नाही. यात्रा सुरू असताना सरकारही चालेल. पक्षाचे कितीही कार्यक्रम असोत, किंवा माझी यात्रा असेल, किंवा निवडणुकीची कामे असतील, हे करताना पहिले प्राधान्य सामान्य माणसांच्या प्रश्नांना द्या! जलयुक्त शिवारातून दुष्काळ मुक्तीकडे, भाषण नव्हे कृतीतून सामाजिक न्याय, शिक्षणात पहिल्या ३ मध्ये महाराष्ट्र, आरोग्यात ६ व्या क्रमांकावरून तिसरा क्रमांक, रोजगारात महाराष्ट्र पहिला, सर्वाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प असलेला महाराष्ट्र, शेतीसाठी सर्वाधिक तरतूद करणारा महाराष्ट्र असा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र भरारी घेतो आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी नव्या दमाने पुन्हा मैदानात उतरावे लागेल. तितक्याच उमेदीने मैदानात उतरावे लागेल. अभिमान असावा पण गर्व नसावा, हे कायम लक्षात ठेवा. प्रत्येक युद्ध सारखे नसते. युद्ध बदलले की शस्त्र बदलावी लागतात आणि युद्धाचे मैदान बदलले की रणनीती बदलावी लागते. ही निवडणूक युतीतच लढणार, मनात कुठलाही संभ्रम ठेवू नका. मुख्यमंत्री जनता ठरवित असते. माध्यमे संभ्रम निर्माण करतात. त्याकडे लक्ष देऊ नका, असे सष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मी आधीच सांगितले आहे, मी पुन्हा येईन!… मी केवळ भाजपचा नाही तर सेनेचा, रिपाईचा, रासपाचा अशा सर्व पक्षांचा मुख्यमंत्री आहे, असे ते म्हणाले. आपल्याला पराभूतांशी लढायचे आहे, तरीही सहज घेऊ नका. काँग्रेस-राष्ट्रवादीला पुढचे १५-२० वर्ष विरोधी पक्ष म्हणून तयार करणे ही जबाबदारी आपल्यावरच आहे.पहिले पाऊल टाकणारेच इतिहास घडवितात, हे कायम लक्षात ठेवा. चंद्रावर पाहिले पाऊल म्हणूनच नील आर्मस्ट्राँगचे पडले. प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन अतिशय महत्वाचे असते. भाजपा ही जनतेची पार्टी, त्यामुळे येणार्‍यांचे स्वागतच आहे.

माझ्यासमोर बसलेला कार्यकर्ता आणि महाराष्ट्रातील जनता हेच माझे दैवत आहे आणि तीच माझी दैवी शक्ती आहे. आज महाराष्ट्र भाजपची संसद येथे जणू बसली आहे, संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व या बैठकीत आहे. विकसित भारतासाठी आपल्या आयुष्याची आहुती देणारा हा आपला कार्यकर्ता आहे. मी त्याला शत शत नमन करतो. स्व. प्रमोदजी, स्व. गोपीनाथजी आज हे यश बघायला हवे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाची धूळ जरी आपण होऊ शकलो, तरी आपले ते भाग्य आहे. देश परमवैभवाकडे जातो आहे आणि त्यात खारीचा वाटा देता येतो आहे, हे माझ्या दृष्टीने कुठल्याही पदापेक्षा महत्वाचे, आहे.

220 जिंकायच्याच -चंद्रकांत पाटील
आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या किमान 220 जागा जिंकल्याच पाहिजेत, ही आपली जिद्द आहे. असा निर्धार व्यक्त करत, जिथे भाजपा उमेदवार असतील तिथे आणि जिथे मित्र पक्षांचे उमेदवार असतील तिथेही भाजपा निवडणूक लढणार आहे हे जाणून सर्व 288 जागांवर कामाला लागण्याच्या सूचना महाराष्ट्राचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

महाराष्ट्रातील जनता हेच माझे दैवत आहे आणि तीच माझी दैवी शक्ती आहे. आज महाराष्ट्र भाजपची संसद येथे जणू बसली आहे, संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व या बैठकीत आहे. विकसित भारतासाठी आपल्या आयुष्याची आहुती देणारा हा आपला कार्यकर्ता आहे. मी त्याला शत शत नमन करतो                                               –-देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री