संघाची विचारधारा समजून घेण्यासाठी गेलो होतो

नितेश राणे यांचा खुलासा

Mumbai
mla nitesh rane
नितेश राणे

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नितेश राणे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतील एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. आपण आरएसएसची विचारधारा समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

सोशल मीडियावर आमदार नितेश राणे यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत नितेश राणे संघ शाखेत शिस्तपालन करत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसवर टीका करणार्‍या नितेश राणे यांनी संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने अनेकांनी त्यावर टीका केली होती. त्याबाबत बोलताना राणे यांनी आपण आरएसएसची विचारधारा समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. ज्या पक्षात प्रवेश केला त्याची ध्येय-धोरणे, विचार जाणून घेतले, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या फोटोवरून सोशल मीडियावर ट्रोल करणार्‍यांनाही नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. ‘नितेश राणेंना ओळखणारे ट्रोल करणार नाहीत’, असे त्यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा प्रखर विरोध झाला आहे. शिवसेनेकडून सतीश सावंत यांना कणकवलीतून राणे यांच्याविरोधात रिंगणात उतरवले आहे. याबाबत बोलताना माझ्यापुढे कुणाचेही आव्हान नाही, लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे’, अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे.