बाधितांना मोबदला न देता रस्त्याचे काम केल्यास मोर्चा काढू; भूमिपुत्रांचा इशारा

Thane

भिवंडी-कल्याण-शिळफाटा सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम आठवडाभरात सुरू करण्यात येणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केले आहे. मात्र यावरून बाधित भूमिपुत्र आक्रमक बनले आहेत. मोबदला न देता रस्त्याचे काम कराल तर लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधींच्या घरांवर मोर्चे काढू, असा इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मागील गुरुवारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या कामासंदर्भात एमएसआरडीसी अधिकार्यांसोबत बैठक घेऊन रस्त्याचे काम आठवडाभरात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर खासदारांच्या या वक्तव्यावर स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत.

भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्यात (SH 40) बाधीत खाजगी जमिनमालकांच्या मोबदल्याचा विषय हायकोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. तसेच या विषयात पालकमंत्री सकारात्मक भूमिकेत असताना त्यांचे खासदार सुपूत्र डॉ. श्रीकांत शिंदे MSRDC प्रशासनाशी बैठक घेऊन कल्याण-शिळफाटा रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यास आग्रही असल्याचे समजताच आगरी कोळी भूमिपुत्र महासंघ संलग्न सर्व पक्षिय युवा मोर्चा यांनी संबंधीत प्रमुख जमीन मालकांची जय हनुमान व्यायामशाळा कोळेगाव येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपस्थित असलेल्या व काही बाहेरगावी असलेल्या जमीन मालकांनी फोनद्वारे संपर्क करून बैठकीत घेतलेल्या निर्णयांना सहमती दर्शवली आहे. मोबदला न देता खाजगी जमिनीमध्ये रस्त्याचे काम सुरू केले तर त्याच ठीकाणी रस्तारोको आंदोलन केले जाईल. तसेच अशा कामांना आदेश देणाऱ्या मंत्री, खासदार, लोकप्रतिनीधींच्या घरांवर लोकशाही मार्गाने मोर्चे काढले जातील, असेही बैठकीत ठरले. या बैठकीत आगरी-कोळी समाजाचे नेते संतोष केणे, गणेश म्हात्रे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here