जिमखानाच नाही मग फी कसली?

आनंद विश्व गुरूकुलमधील विद्यार्थ्यांचा सवाल

Mumbai
Anand vishwa Gurukul

कोणत्याही प्रकारची फी आकारताना तशी सेवा देणे बंधनकारक आहे. मात्र या बाबींचा ठाण्यातील अनेक शाळा महाविद्यालयांना विसर पडलेला आहे. ठाण्यातील आनंद विश्व गुरुकूल या शाळेने गेले शैक्षणिक वर्षे 2018-19 मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जिमखाना करिता वेगळी फी आकारली आहे. या शैक्षणिक वर्षाचा पूर्वार्ध संपला असून आता उत्तरार्ध सुरू झाला तरी अद्यापही शाळेत जिमखानाची वास्तू उपलब्ध होऊ शकलेली नाही. मग जिमखाना फी कशासाठी अशी तक्रार विद्यार्थी करत आहेत. एकीकडे ठाण्यामध्ये सत्ताधारी पक्ष ठाणे परिसरात ओपन जीम निर्माण करित आहेत. मात्र ज्या ठिकाणी या सर्व गोष्टींची गरज आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थी वर्ग आहे, त्याच ठिकाणी अशा वास्तूंची वानवा असल्याने पालकवर्गातही चिंतेचे वातावरण आहे.

शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ विद्यालयातून आकारले जाणारे वार्षिक शुल्क अथवा इतर फी हे त्या त्या शाळेत अथवा महाविद्यालयात दिल्या जाणार्‍या सोयीसुविधांवर आधारीत असतात. तसेच ज्या सुविधांवर शुल्क आकारले आहेत ती सुविधा पुरविणे प्रत्येक शाळेला बंधनकारक आहे. तसे न झाल्यास आता तेथील विद्यार्थी वर्ग ग्राहक मंच कायद्याअंतर्गत न्याय मागू शकतो. ती बाब सिद्ध झाली तर संबंधित शाळेवर गुन्हा दाखल होऊ शकतो. अशी तरतूद ग्राहक संरक्षण कक्षाअंतर्गत करण्यात आली आहे. मात्र शाळेच्या या कारभाराविरोधात आम्ही काही बोललो तर शाळा आमच्यावर छुपी कारवाई करण्याचा धोका असल्याने आम्ही याबद्दल काही बोलू शकत नाही. आम्ही मागील अनेक महिन्यांपासून याबद्दल शाळेला विचारले, मात्र याकडे शाळा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, असे काही विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

जागेअभावी जिमखान्याची वास्तू उपलब्ध नसली तरी शाळेत खेळ नियमितपणे सुरू आहेत. जिमखाना म्हणजे चार भिंतीची खोली नाही, तर त्यामध्ये इतर खेळांचाही समावेश होतो. आज आमच्या शाळेत खेळांसाठी सहा शिक्षक आहेत. इतके आम्ही खेळाला महत्त्व देत आहोत. तरीही विद्यार्थ्यांची याबाबत काही तक्रार असेल तर आम्ही विद्यार्थ्यांशी सल्लामसलत करून याबाबत मार्ग काढू.
– प्रदीप ढवळ, व्यवस्थापन समिती, सेक्रेटरी, आनंद विश्व गुरुकूल विद्यालय

अनेक शाळा जिमखाना फी म्हणून अधिक रक्कम घेत असतात. मात्र या रकमेचा विनियोग संबंधित विभागाकरिता होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही प्रत्येक शाळा-महाविद्यालयात जाऊन याबाबत जाब विचारणार आहोत.
– दीपक विठ्ठल जाधव, उपाध्यक्ष मनविसे, ठाणे शहर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here