पालिकेचे नालेसफाईकडे दुर्लक्ष

नाला झाला हिरवागार,नागरिक डासांनी बेजार

Mumbai
नाला

नालासोपारातील मुख्य नाल्यावर जमलेली पान वनस्पती न हटवल्यामुळे त्याखाली डासांची उत्पत्ती होऊन या डासांकडून समेळगावात शिरकाव झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

नालासोपारा पश्चिमेकडील समेळ गावाच्या वेशीवर एक भलामोठा मुख्य नाला आहे. विरारकडून वाहणारा हा नाला वसईतील आचोळे खाडीला जावून मिळतो. गेल्या पावसाळ्यात हाच नाला दुथडी भरून वाहिल्यामुळे सोपारा, समेळपाडा, साईनगर, श्रीप्रस्थ, लोढानगर आणि आसपासच्या घरात पाणी शिरले होते. आता याच नाल्यात सांडपाणी ठाण मांडून बसल्यामुळे त्यावर पाण वनस्पती फोफावली आहे. या वनस्पतीच्या पानांच्याखाली मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. अंधार आणि घाणेरडे पाणी या दोन गोष्टी डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल ठरल्या आहेत. नाल्यातील पाण्यावर असलेल्या पान वनस्पतीखाली अंधार असल्यामुळे 24 तास डासांची उत्पत्ती होते, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी वैद्यकिय अधिकारी डॉक्टर जी.पी.मेन यांनी दिली.

हे डास संध्याकाळी समेळगाव, साईनगर आणि आसपासच्या परिसरातील घरात शिरून रात्रभर नागरिकांवर हल्ला करीत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही किटकनाशक औषधे, मॅट, अगरबत्ती, लिक्विडचा परिणाम होत नाही. अंधार पडल्यावर इमारती, रस्ते, मोकळा परिसर अशा सर्वच ठिकाणी या डासांचा थवा फिरत असल्यामुळे घराबाहेर पडणेही नागरिकांना मुश्किल झाले आहे. महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च आरोग्यावर विशेषतः नालेसफाई आणि औषध फवारणीवर केला जात असतानाही डासांची उत्पत्ती वाढत आहे.

या प्रकरणी जिल्हा परिषदेचे सभापती किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, नाल्यावरील पान वनस्पती ताबडतोब काढण्यात येईल आणि परिसरात धुरांची फवारणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच हा नाला अधिक रुंद करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, तो सतत वाहता राहील याची खबरदारी घेण्यात येईल, अशीही त्यांनी अधिक माहिती दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here