घरमुंबईमुंबईकरांचा जीव अनधिकृत रुग्णालयांच्या हवाली! भंडारा दुर्घटनेची होणार पुनरावृत्ती?

मुंबईकरांचा जीव अनधिकृत रुग्णालयांच्या हवाली! भंडारा दुर्घटनेची होणार पुनरावृत्ती?

Subscribe

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात आग लागून १० लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने तेथील आणखीन ७ बालकांना वाचविण्यात अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे यश आले आहे. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्याचबरोबर याप्रकरणी चौकशी व कारवाईचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. मात्र भंडारा दुर्घटनेची पुनरावृत्ती मुंबईतील काही रुग्णालये, प्रसूतिगृहे,नर्सिंग होम आदी ठिकाणी होण्याची दाट शक्यता आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी व्यक्त केली आहे. शकील शेख यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या अर्जातून मिळालेल्या माहितीवरून मुंबईतलं हे भीषण वास्तव समोर आलं आहे.

शकील शेख यांनी मुंबईतील रुग्णालयांबाबत माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल करून किती रुग्णालये अधिकृत आहेत? किती रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा नाही? याबाबत माहिती मागवली होती. त्यावर त्यांना जी काही माहिती पालिकेकडून देण्यात आली ती पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला.

- Advertisement -

रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेचे तीनतेरा!

मुंबईत एकूण १ हजार ३१९ रुग्णालये, नर्सिंग होम आदी आहेत. त्यापैकी एकट्या एम/ पूर्व विभागात ६० रुग्णालये असून त्यापैकी ३६ रुग्णालये अनधिकृत असून २४ कायदेशीर आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील रहिवाशी, व्यावसायिक इमारतीत कार्यरत अनेक रुग्णालये, प्रसूतिगृहे, नर्सिंग होममध्ये अग्निरोधक यंत्रणाच नाही. अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्र नाही. त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या नियमांचे पालन करण्यात येत नाही, असे आरटीआय कार्यकर्ता शकील शेख यांनी म्हटले आहे.

पालिकेने औपचारिकता म्हणून फक्त अग्निशमन दल, पोलीस यांना सदर ठिकाणी कार्यवाही करण्यास सांगितले आहे. मात्र, पोलिसांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यासाठी बोलावल्यास हे अधिकारी जात नाहीत, असे शकील यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकूणच पालिका, अग्निशमन दल व पोलीस यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची खंत शकील यांनी व्यक्त केली आहे. ‘त्यामुळे उद्या मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेची पुनरावृत्ती घडू शकते’, अशी शक्यता शकील शेख यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

मुंबईतील रुग्णालयांनी काळजी घ्यावी – महापौर

दिल्लीत अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती, त्यावेळी मुंबईतील सर्व रुग्णालयांचे ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आता भंडाऱ्यासारख्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सर्व रुग्णालय आणि प्रशासकीय अधिकारी आणि अग्निशमन दल आदींनी मुंबईत अशी दुर्घटना घडणार नाही याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. अग्निशमन विभागाने सुद्धा मुंबईत अशी घटना घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सर्व रुग्णालयाची यंत्रणा योग्य ठेवण्यात यावी, असे आदेश दिल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -