घरमुंबईभाईंदरमध्ये स्कायवॉकवर बेकायदेशीर मोबाइल टॉवर

भाईंदरमध्ये स्कायवॉकवर बेकायदेशीर मोबाइल टॉवर

Subscribe

भाईंदर पश्चिमेच्या रेल्वे स्टेशन बाहेरून जाणार्‍या स्कायवॉकवर सुरक्षा नियम धाब्यावर बसवून मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. भाईंदर पश्चिमेला स्टेशनच्या बाहेर स्कायवॉक असून या स्कायवॉकवर वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे टॉवर सुरक्षा नियम धाब्यावर बसवून लावलेले आहेत. शहरात अनेक ठिकाणी इमारतीच्या गच्चीवर व रहिवाशी वस्तीत मोबाईल टॉवर लावलेले आहेत. या टॉवरमधून मानवाच्या आरोग्यास धोकादायक असलेले रेडिएशन होत आहे. या रेडिएशनचा 200 मीटरच्या अंतरापर्यंत परिणाम होतो. नियमित या रेडिएशनच्या रेंजमध्ये राहणार्‍या रहिवाशांना कँसर, माइग्रेन, हार्ट अटॅक यासारख्या आजाराची लक्षणे दिसून येतात.

रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या या स्कायवॉकवर दिवसभर हजारो प्रवाशी ये जा करत असतात. कोणत्याही सुरक्षेविना येथे मोबाईल टॉवर कोणाच्या परवानगीने लावण्यात आले हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती घेतली असता त्या विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांनी सांगितले की, आमच्या विभागाकडून या टॉवरसाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. तरीही एवढा मोठा प्रवाशांच्या सुरक्षेचा धोकादायक प्रकार सुरू असताना रेल्वे विभागाकडून दक्षता घेतली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरात असे अनेक टॉवर बेकायदेशीरपणे उभारले जात आहेत. तरीही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे या टॉवरच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या टॉवरच्या रेडिएशनचा लहान मुले व वृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे टॉवर पासून सुरक्षा मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -