‘एमआयडीसी’ च्या मोकळ्या भूखंडावर झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण

अनधिकृत झोपड्यांचा सुळसुळाट (सौजन्य- मुंबई लाइव्ह )

दिघा येथील नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावरच एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण धारकांनी अनधिकृत झोपड्या उभारल्याने भविष्यात हा भूखंड हडप केला जाऊ शकतो. त्यामुळे या झोपड्यांवर कारवाई करून तिथे गार्डन आणि ओपन जिम ची निर्मिती करावी, अशी मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे सचिव डॉ. दीपक काळे यांनी पत्राद्वारे विभाग अधिकाऱ्याकडे केली.

अनधिकृत झोपड्यांवर कारवई करा
दिघा येथील मुकुंद कंपनी समोर ठाणे- बेलापूर महामार्गाच्या लगत एक मोकळा भूखंड आहे. या ठिकाणी शेकडो अनधिकृत झोपड्या वसलेल्या आहेत. त्यात राहत असलेले नागरिक दारू पिऊन भांडणं करतात. तर काही जण कुणाचीही तमा न बाळगता चरस, गांजा सारखे अमली पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या महिलांनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यावर तत्काळ कारवाईची गरज असल्याचे डॉ. दीपक काळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. याच ठिकाणाहून एमआयडीसीची जलवाहिनी गेली आहे. त्या जलवाहिनीला भगदाड पाडून हेच नागरिक पाणी भरत आहेत. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या परिसरात सार्वजनिक शौचालयाची सोय नसल्याने हेच नागरिक उघड्यावरच नैसर्गिक विधी करत आहेत. अश्या नियमबाह्य कार्यरत असणाऱ्या नागरिकांवर व त्यांच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काळे यांनी केली आहे. याबाबत दिघा विभाग कार्यालयाच्या विभाग अधिकारी प्रियांका काळसेकर यांना विचारले असता, ‘मी आताच रुजू झाली असून पत्र बघून कारवाई करते’, असे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here