चिंताजनक! प्रदूषणामुळे भिवंडीकरांचे आरोग्य धोक्यात

डाईंग सायजींगमध्ये प्लास्टिकसह कचरा कपड्याच्या चिंध्या जाळल्याने होतंय मोठ्या प्रमाणात प्रदूषण

भिवंडी शहर परिसरात कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाइंग व सायजिंगमध्ये असलेल्या बाँयलरमध्ये पाणी गरम करण्यासाठी कोळसा व लाकूड जाळण्याऐवजी प्लास्टिक आणि कापडी चिंध्यांचा कचरासह रासायनिक द्रव्य जाळण्यासाठी वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डाईंग सायजींग मध्ये प्लास्टिक सह कचरा कपड्याच्या चिंध्या जाळल्या जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊ लागले आहे. त्यामुळे कल्याण रोड गोपाळनगर परिसरात राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना खोकला, दमा याच बरोबर अन्य प्रकारचे आजार जडत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याचाही त्रास होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नगरसेवकांसह स्थानिक जेष्ठ नागरिकांनी केली आहे. राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे तर दुसरीकडे प्लास्टिकचा थेट वापर डाइंग सायजिंग चालक मालक अशा प्रकारे करीत असल्याने या डाइंग सायजिंग मालकांकडून शासनाचा नियमांची पायमल्ली होत आहे. शहरातील कल्याण रोड, शास्त्रीनगर, लाहोटी कंपाऊंड, खोका कंपाऊंड, कणेरी, दरगाह रोड, नारपोली, भंडारी कंपाऊंड अशा विविध नागरीवस्ती लगत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात डाईंग व सायजींग आहेत. त्यामध्ये यंत्रमाग कारखाने मध्ये तयार झालेल्या कपड्यावर रंगाची प्रक्रिया गरम पाण्यात केली जाते. त्यासाठी सायजीग डाईंगमध्ये मोठ्या बाँँयलरमध्ये दगडी कोळसा व लाकूड टाकून पेटवून पाणी गरम केले जाते.

सध्या दगडी कोळला व लाकूड महाग झाल्याने डाईंग व सायजींग मालक सायजिंगमध्ये जाळणासाठी प्लास्टिक व कापडी कचरा चिंध्याचा वापर करीत आहेत. अशा विविध भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे.स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी डाइंग मालक लाकूड, दगडी कोळसा ऐवजी प्लास्टिक थैल्या आणि वेस्टेज कापडी चिंध्यांचा कचरा वापर करीत आहे. डाइंग सायजिंग मालकांच्या या आर्थिक बचतीचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे. प्रदूषणा मुळे जेष्ठ नागरिकांसह महिला, शाळकरी विध्यार्थी व नागरिकांना खोकला, दमा सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे भिवंडीत प्रदुषण करणाऱ्या या डाइंग सायजिंग मालकांवर पालिकेचे अधिकारी व कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याबाबत पालिकेचे विरोधी पक्षनेते यशवंत टावरे यांनी आयुक्तांनी याबाबत लक्ष द्यावे व कारवाई करावी अशी मागणी केली आहे.


न भूतो, न भविष्यती! २ हजार वर्षांपूर्वी मेलेल्या माणसाच्या मेंदूतल्या जिवंत पेशी सापडल्या!