पालिकेची स्वच्छता मोहिम; एकाच दिवशी २ हजार ७८० टन कचरा केला गोळा

मुंबई परिसर अधिकाधिक स्वच्छ रहावा या उद्देशाने एक विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.

In one day 2thousand and 780 tons waste is collected in mumbai
पालिकेची स्वच्छता मोहिम

मुंबई परिसर अधिकाधिक स्वच्छ रहावा या उद्देशाने गुरुवारी एक विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त  इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात आयोजित या एक दिवसीय मोहिमेअंतर्गत मुंबई महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालये, उद्याने, पुतळे आणि स्मारके, बसथांबे, तलाव आणि स्वच्छतागृहे, प्रसिद्ध पर्यटन स्थळे, भाजी मंडई, वाणिज्यिक क्षेत्रे, उड्डाणपूल, चौपाट्या, रस्ते इत्यादी ठिकाणांची साफसफाई व स्वच्छता करण्यात आली. या विशेष मोहिमेत १५ हजार २३० महापालिका कर्मचाऱ्यांसह २ हजार ८८४ स्वयंसेवक देखील सहभागी झाले होते. या अंतर्गत दिवसभरात २ हजार ७८० टन कचरा संकलित करण्यात आला.

मुंबईतील स्‍वच्‍छता ही सातत्‍याने अधिकाधिक प्रभावी आणि लक्षणीय व्‍हावी, यासाठी मुंबई  महानगरपालिकेचे घनकचरा व्‍यवस्‍थापन खाते आणि महापालिकेचे सर्व २४ प्रशासकीय विभाग सातत्‍याने कार्यरत असतात. या अनुषंगाने लोक सहभागासोबतच जाणीव जागृती व्‍हावी, याकरिता विविध उपक्रम देखील राबविण्‍यात येत असतात. याच शृंखले अंतर्गत बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या क्षेत्रात एक दिवसीय विशेष जाणीव-जागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्‍यात आली आहे. लोकप्रतिनिधीच्‍या सहभागाने राबविण्‍यात आलेल्या या मोहिमेत बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या कामगार, कर्मचारी आणि अधिकारी या मोहिमेत सहभाग नोंदविला. त्‍याचबरोबर महापालिकेच्‍या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्‍ये राबविण्‍यात आलेल्‍या या मोहिमेत नागरिकांनी देखील मोठया उत्‍साहाने सहभाग नोंदविला.

या मोहिमे अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खात्याशी संबंधित विविध कंत्राटी संस्थांनीही सहभाग घेतला. त्याचबरोबर या एक दिवसीय मोहिमे दरम्यान घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित अत्याधुनिक स्वरुपाची विविध यंत्रसामुग्री देखील प्रभावीपणे उपयोगात आणण्यात आली. या मोहिमे अंतर्गत सर्व २४ विभागांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रासंगिक उपक्रमांमध्ये संबंधित लोकप्रतिनिधींसह स्थानिक सहाय्यक आयुक्तांनी देखील भाग घेतला, अशीही माहिती मुंबई महापालिकेच्‍या घनकचरा व्यवस्थापन खात्‍याचे प्रमुख अभियंता अशोक यमगर यांनी दिली आहे.


हेही वाचा – दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांचाही शाळा व्यवस्थापन समितीत समावेश