घरमुंबईऐन दिवाळीत गुंतवणुकदारांना चुना ,खासगी पतसंस्थेने ३८ कोटी घातले खिशात

ऐन दिवाळीत गुंतवणुकदारांना चुना ,खासगी पतसंस्थेने ३८ कोटी घातले खिशात

Subscribe

दोन दिवसांवर दिवाळी आल्याने खरेदीसाठी लागणार्‍या पैशांसाठी गुंतवणूकदार पतसंस्थेत गेले. परंतु पतसंस्थेच्या दारावर भलत्याच दुकानाचा फलक पाहून गुंतवणुकदारांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी दुकानदाराकडे चौकशी केली असता सात दिवसांपूर्वीच पतसंस्था बंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे गुंतवणुकदारांनी तातडीने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. फसवणुकीप्रकरणी पतसंस्थेविरोधात 27 जणांनी तक्रारी दाखल केल्या असल्या तरीही प्रत्यक्षात गुंतवणूकदार आणि गुंतवलेल्या रकमेबाबत पोलिसांकडेही कोणतीही ठोस माहिती नाही.

मालाडच्या राणी सेठी मार्गावर असणार्‍या एका रेसीडेन्सी इमारतीत माँ कालिका को. ऑप.सोसायटी या नावाने एक पतसंस्था उघडण्यात आली होती. गुंतवणुकदारांना दोन ते तीन टक्क्यांचे आमिष दाखवून मालकांनी ठेवी करून घेतल्या. मात्र मागील सहा महिन्यांपासून गुंतवणुकदारांच्या देणे थकवल्याच्या तक्रारी सुरु होत्याच आणि आता ऐन दिवाळीत पतसंस्थेचा मालक आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोबारा केला आहे. याप्रकरणी गुंतवणुकदारांनी दिलेल्या तक्रारीवरुन पतसंस्थेचा मालक आणि त्याच्या दोन मुलांविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या पतसंस्थेत गुंतवणूक करणारे रोहीत गुप्ता आणि ब्रिजलाल गुप्ता यांनी जवळपास ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र मागील सहा महिन्यापासून पतसंस्थेच्या मालकाकडे तगादा लाऊनसुद्धा गुंतवणूक केलेले पैसे देण्याचे तो टाळत होता. अखेर गुंतवणुकदारांच्या तगाद्याला कंटाळून पतसंस्थेची जागा दुसर्‍याला विकून त्याने पोबारा केला असल्याचे समोर आले आहे.

पतसंस्थेची जागा दुसर्‍या दुकानदाराच्या हवाली करुन पसार झालेले पतसंस्थेचे मालक असणारे आरोपी प्रमोदकुमार मिश्रा (५५ वर्षे),नित्यानंद प्रमोदकुमार मिश्रा (३१ वर्षे),निलेश प्रमोदकुमार मिश्रा (३२ वर्षे) या तिघांविरुद्ध कुरार पोलिसांनी फसवणूक आणि अपहार केल्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. गुंतवणूक करणार्‍यांनी त्यांची ठेवीचा कालावधी पूर्ण होताच त्यांची रक्कम व्याजासहित परत मागण्यास सुरुवात केली. पण आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली होती. मागील सहा महिन्यांपासून ते गुंतवणुकींदारांपासून दूर राहण्याचाच प्रयत्न करत होते. अखेर आपल्या सहकुटुंबासह त्यांनी तिथून पोबारा केल्याने अनेक गुंतवणुकीदारांना चिंतेने ग्रासले आहे. कुरार पोलीस ठाण्यात आतापर्यंत या पतसंस्थेत गुंतवणूक केलेल्या २७ जणांनी हजेरी लावलेली असून अन्य गुंतवणुकदारांचा पोलीस तपास करत असल्याची माहीती कुरार पोलिसांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान तक्रारदारांच्या बाजूने उभे राहणारे वकील देवेश यादव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आतापर्ंंत त्यांच्याकडे १५० च्या आसपास गुंतवणुकदार तक्रार घेऊन आले असून या गुंतवणुकदारांची बुडालेली रक्कम ही ८ कोटींच्या आसपास आहे. सुमारे एक हजार गुंतवणुकदारांनी आतापर्यंत या पतसंस्थेत पैसे गुंतवले होते असा दावा त्यांनी केला असून ही रक्कम ३८ कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले.

फिर्यादिंच्या तक्रारीनुसार आम्ही पतसंस्थेचे मालक आणि त्यांच्या साथीदारांवर फसवणूक करुन गुंतवणुकदारांची रक्कम अपहार केल्यामुळे गुन्हा नोंदविला आहे. या पतसंस्थेतले २७ गुंतवणुकदार पोलीस ठाण्यात आले असून उरलेल्या गुंतवणुकदारांचा आम्ही शोध घेत आहोत. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

-उदय राजेशिर्के,वरीष्ठ पोलीस निरीक्षक, कुरार पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -