सोशल मीडियाच्या काळातही प्रिंट मीडियाची विश्वासार्हता कायम

आमदार अमरिश पटेल यांचा विश्वास,मुकेश पटेल स्मृती मीडिया सेंटरचे उद्घाटन

Mumbai
मुकेश पटेल स्मृती मीडिया सेंटरचे उद्घाटन

आजही प्रिन्ट मीडिया तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा काही वर्षांपूर्वी होता. आज जरी सोशल मीडिया, टिव्ही चॅनल मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी प्रिन्ट मीडियाची विश्वासार्हता कायम आहे. टिव्ही चॅनल अथवा सोशल मीडियावर आलेली बातमी काही क्षणासाठी असते, अथवा त्या दिवसापुरती असते. मात्र, प्रिन्ट मीडियावर ती बातमी कायमची कोरली जाते. अगदी महिन्यानंतर वर्षानंतरही तिचा पाठपुरावा केला जातो. अग्रलेखाच्या माध्यमातून अथवा अन्य लेखांच्या माध्यमातून त्या बातम्यांवर अथवा घटनेवर परिपूर्ण लिखाण होते. म्हणूनच प्रिन्ट मीडिया आजही महत्त्वाचा आहे, असा विश्वास माजी शिक्षणमंत्री आणि आमदार अमरिश पटेल यांनी व्यक्त केला. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मीडिया सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मुंबई मराठी पत्रकार संघासाठी मी जे काही केले ते काही एवढे मोठे काम नाही. याहीपेक्षा अधिक काही मदत संघासाठी लागेल तर त्यांनी बिनदिक्कतपणे माझ्याकडे यावे, मी सदैव तत्पर आहे. आज मीडिया सेन्टरला माझे लहान बंधू मुकेश पटेल यांचे नाव दिले. जे या प्रिन्ट क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनाही या क्षेत्राची आवड होती. संघाने त्यांचे नाव देऊन त्यांचा गौरव केल्याबद्दल मी संघाचा आभारी आहे. खरे तर मिडीया सेंटर उभारणीसाठी मी जे काही केले त्याचा प्रचार करण्याची काही गरज नव्हती. आपण समाजासाठी जे काही करतो हे काय म्हणून समाजाला दाखवायचे? या उद्देशानेच मी या कार्यक्रमाला येणार नव्हतो. मात्र संघाच्या सदस्यांनी आणि माझे मित्र संजय सावंत यांनी कौटुंबिक कार्यक्रमाचा आग्रह धरल्यामुळे मी येथे उपस्थित राहिलो. यापुढेही संघाच्या कोणत्याही कार्यक्रमाला अथवा कोणाला प्रोत्साहित करण्याकरता पारितोषिक देण्याची गरज लागली तर तशी सूचना करावी, मी ती आनंदाने पूर्ण करेन. कारण आज चांगल्या लोकांना प्रोत्साहित करणे काळाची गरज आहे. कारण हल्ली चांगले लोक सापडणे मुश्कील झाले आहे. प्रत्येकजण काहींना काही स्वार्थ घेऊनच येत असतो. पण समाजात जे काही थोडे लोक चांगले काम करत आहेत. खरे तर त्यांच्यावरच आज समाजाचे चांगलेपण टिकले आहे. अशा लोकांना प्रोत्साहित करणे त्यांना चालना देणे यासाठी मी कधीही तत्पर असेन, असे आश्वासनही यावेळेस पटेल यांनी दिले.

याप्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, आपलं महानगरचे संपादक संजय सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. तर स्वाती घोसाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर संयुक्त कार्यवाह सुरेश वडवलकर यांनी आभार मानले.