ग्रीसच्या तुरुंगातील भारतीय खलाशांची १४ महिन्यांनंतर सुटका

Mumbai
रविवारी जल्लोषात होणार स्वागत

ग्रीसमधील कोर्याडॅल्लोस तुरुंगात तब्बल १४ महिन्यांपासून गजाआड असलेल्या पाच भारतीय खलाशांची लवकरच सुटका होणार आहे. येत्या रविवारी ते मुंबईत दाखल होणार असून तेथील न्यायालयाने मुक्त्तता केल्यामुळे त्यांची सुटका केली जाणार आहे. देशातील मर्चंट नेव्ही अधिकार्‍यांची सर्वात जुनी आणि अग्रगण्य संघटना- ‘मेरिटाइम युनियन ऑफ इंडिया’ रविवारी सकाळी मुंबई विमानतळावर मोठ्या जल्लोषात या पाच खलाशांचे स्वागत करणार आहेत.

जानेवारी २०१८ मध्ये एमव्ही एन्ड्रोमेडा हे कार्गो जहाज जेव्हा ग्रीसमधील पीरेयस हार्बर नावाच्या एका बंदरात गेले, तेव्हा तिथल्या स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांनी सतीश विश्वनाथ पाटील, जयदीप ठाकूर, भूपिंदर सिंग, प्रीतम सिंग आणि बलकार सिंग या पाच भारतीय ‘सीफेरर्स’ना ताब्यात घेतले आणि तुरुंगात डांबले. एमव्ही एन्ड्रोमेडा या जहाजावर स्फोटक पदार्थ असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली. मात्र, या जहाजावरील स्फोटक पदार्थ हे फटाक्यांसाठीची कच्ची सामग्री होती, ते काही घातपाती कारवायांसाठी वापरले जाणारे स्फोटक पदार्थ नव्हते, असा निर्वाळा पंधराच दिवसांपूर्वी अथेन्स न्यायालयाने दिल्यामुळे या पाच भारतीय सीफेरर्सची सुटका करण्यात आली, अशी माहिती मेरिटाइम यूनियन ऑफ इंडियाचे सरचिटणीस अमरसिंग ठाकूर यांनी दिली.

ज्या तुरुंगात या पाच भारतीयांना डांबण्यात आले होते, तो कोर्याडॅल्लोस तुरुंग हा कैद्यांची अतिगर्दी आणि अमानवी वागणुकीसाठी कुप्रसिद्ध आहे. अशा तुरुंगात तब्बल १४ महिने काढावे लागल्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय तसेच मानसिक उपचारांसाठी मेरिटाइम यूनियन ऑफ इंडिया सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची माहिती ‘एमयूआय’चे सरचिटणीस अमरसिंग ठाकूर यांनी दिली. भारतात परतल्यावर या पाचही जणांची शिपिंग इंडियाचे प्रभारी महासंचालक अमिताभ कुमार यांच्याशीही भेट घडवली जाणार आहे, असेही अमरसिंग ठाकूर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here