घरमुंबईशिवतिर्थासाठी शिवसेनेकडून चाचपणी सुरू

शिवतिर्थासाठी शिवसेनेकडून चाचपणी सुरू

Subscribe

शिवाजी पार्क मैदानासाठी महापालिकेकडून मागवली माहिती

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापनेच्या दावा करणार्‍या शिवसेनेने आता मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या शपथविधीसाठी शिवाजी पार्क मैदानाची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतिर्थावरच करण्यासाठी शिवाजी पार्क मैदान बुक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

विधानसभा निकालानंतर शिवसेनेचे ५6 आमदार निवडून आल्यानंतर तसेच आठ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यानंतर त्यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि शिवाजी पार्कवर मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा शपथविधी होईल,असे जाहीरपणे शिवसेनेकडून सांगितले जाते. परंतु खोटारडे ठरवले गेल्यामुळे मन दुखावल्या गेलेल्या शिवसेनेने भाजपशी फारकत घेण्यास सुरुवात केली. त्यानंतरही शिवसेनेने वारंवार शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल,असेही जाहीरपणे वक्तव्य करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

परंतु त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची मदत घेऊन सत्ता स्थापन केल्याचा दावा केल्यानंतर मुख्यमंत्री बनवण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमच्या नावाखाली अद्यापही शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्न साकार होण्यास अडचणी येत आहेत. मात्र, शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल,असा शिवसेनेचा दाट विश्वास असून त्या दृष्टीकोनातून पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी शिवाजी पार्कच्या मैदानाची नोंदणी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

शिवसेनेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या वतीने सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा शपथविधी शिवतिर्थावर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शिवाज पार्क मैदान कोणत्या तारखेला उपलब्ध होऊ शकते, तसेच त्यांची नोंदणी कशा पध्दतीने करता येऊ शकते. मैदान उपलब्ध करून देण्यासाठी राखीव दिवसांपैकी किती दिवस शिल्लक आहेत, याचीही माहिती शिवसेनेच्यावतीने संकलित करण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्यावतीनेही याची चाचपणी होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी सूत जुळल्यास शिवतिर्थावरील शपथविधी होणार हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सरकार स्थापनेला हिरवा कंदील मिळताच शिवाजी पार्क मैदान राखीव ठेवण्यासाठी महापालिकेच्या जी/उत्तर विभागाच्या कार्यालयात अर्ज केला जाणार असल्याचेही शिवसेनेच्या सुत्रांकडून समजते.

- Advertisement -

बाळासाहेबांचा आज स्मृतिदिन
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतिदिन आज १७ नोव्हेंबर असून यासाठी शिवाजी पार्क मैदानातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मोठ्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी उसळणार आहे. राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन करण्याचा मार्ग दृष्टीक्षेपात असल्याने बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने एकप्रकारे शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून येणार आहेत. त्यामुळे रविवारी विराट जनसागर बाळासाहेबांच्या स्मृतीस मानवंदना देण्यासाठी शिवतिर्थावरील स्मृतीस्थळावर नतमस्तक होणार आहे. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -