इनहाऊस कोट्याचा प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह; कॉलेजांनी जागा सरेंडर केल्यानंतर ही प्रवेश नाहीत

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरु असून दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या यादीत असंख्य विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण मिळवूनही प्रवेश न मिळाल्याची गंभीर बाब समोर आल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Mumbai
andrews college
कॉलेजचे विद्यार्थी

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सध्या अल्पसंख्याक कॉलेजातील प्रवेशावरुन वाद सुरु असताना इनहाऊस कोट्याने अनेक कॉलेज प्राचार्यांची नवी परीक्षा सुरु झाली आहे. मुंबईतील जवळपास सर्वच कॉलेज प्रशासनाने इनहाऊस कोट्यातील रिक्त जागा शिक्षण उपसंचालक विभागाकडे सरेंडर केलेले असताना देखील त्या जागेवर प्रवेशच दिले नसल्याची बाब अनेक प्राचार्यांनी प्रकाशात आणली आहे. मुंबईतील अनेक नामांकित कॉलेजांना देखील याचा फटका बसला असल्याची माहिती अनेक प्राचार्यांंनी आपलं महानगरनकडे दिली. तर या नव्या गोंधळामुळे कॉलेजांतील या जागा रिक्त राहण्याची भीती या प्राचार्यांकडून वर्तविण्यात आली आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरु असून दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या यादीत असंख्य विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण मिळवूनही प्रवेश न मिळाल्याची गंभीर बाब समोर आल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या सर्व गोंधळ अल्पसंख्याक कॉलेजातील जागा या कोर्टाने सरेंडर करण्याची सूचना केल्याने हा घोळ झाल्याचे समोर आले आहे. यात भर म्हणून सध्या इनहाऊस कोट्यातील प्रवेशाने कॉलेजांची झोप उडाली आहे. अनेक कॉलेजांनी त्यांच्या रिक्त जागा प्रवेशासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सरेंडर केल्या आहेत. मात्र दुसर्‍या यादीत अनेक विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये पसंतीक्रम भरलेला असताना देखील या कॉलेजांमध्ये प्रवेश देण्यात आलेले नाहीत. त्यासंदर्भात या कॉलेजांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे लक्ष देखील वेधले मात्र उडवा उडवीचे उत्तर देण्यात आल्याची माहिती यावेळी या कॉलेजांती प्राचार्यांकडून देण्यात आली आहे.

यासंदर्भात पश्चिम उपनगरातील एका नामांकित कॉलेजांच्या प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सूचनेनुसार आम्ही यंदा इनहाऊस कोट्यातील प्रवेश सरेंडर केेले आहेत. त्यानुसार सायन्समधील १००, कॉमर्स मधील १०२ आणि आर्टसमधील एक ८० जागा आम्ही सरेंडर केल्या आहेत. मात्र या जागांवर दुसर्‍या यादीत एक ही प्रवेश देण्यात आलेले नाहीत. विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतरही प्रवेश देण्यात आलेले नाहीत. आमच्या कॉलेज प्रमाणेच इतरही अनेक कॉलेजांमध्ये हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता तिसर्‍या यादीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहेत. ही शंका वाटते. तरी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून याबाबत कोणतीही उत्तर देण्यात आले नसल्याची बाब या प्राचार्यांकडून सांगण्यात आली आहे. याबाबात शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.


-सौरभ शर्मा, मुंबई