घरमुंबई७० वर्षीय पुरुषाच्या पित्ताशय नलिकेत जंत!

७० वर्षीय पुरुषाच्या पित्ताशय नलिकेत जंत!

Subscribe

७० वर्षीय व्यक्तीच्या पित्ताशय नलिकेतून जंत काढण्यास मुंबईतील डॉक्टरांना यश आलं आहे. लहान मुलांच्या पोटात जंत असणं हे साहजिक असतं. पण, ७० वर्षांच्या पुरुषाच्या पोटात जंत आढळणं हे वैद्यकीयदृष्ट्या दुर्मिळ असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मुंबईतील ७० वर्षीय रमेश कुमार (नाव बदललेले) यांना मधुमेह, हायपरटेन्शन आणि हृदयविकार हे आजार होते आणि त्यांना दोन दिवसांपासून पोटात अत्यंत वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांना दैनंदिन कामेही करणे शक्य नव्हते. काही तपासण्या केल्यानंतर त्यांच्या पित्ताशयाच्या नलिकेत जंत असल्याचं उघड झालं. त्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया न करता एण्डोस्कोपिक रेट्रोग्रेड कॉलॅन्जियो-पॅनक्रिएटोग्राफी (ईआरसीपी) ही प्रक्रिया करून जंत बाहेर काढण्यात आले.  मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर यशस्वी ही शल्यचिकित्सा करण्यात आली.

अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील (गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट) डॉ. केयुर शेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांची शारीरिक तपासणी आणि चाचण्या करण्यात आल्या. त्यांना मॅग्नेटिक रेसोनन्स कॉलॅन्जियोपॅनक्रिएटोग्राफी (एमआरसीपी) करण्याचा सल्ला देण्यात आला. ही चाचणी केल्यानंतर त्यांच्या पित्ताशय नलिकेमध्ये मृतावस्थेतील जंत आढळून आले आणि कॅल्क्युलस कोलेसायटिसिस असल्याचे निदान झाले. ड्युओडेनमद्वारे पित्ताशय नलिकेत पोहोचल्यानंतर मृत जंतांचे अनेक तुकडे बलून एक्स्ट्रॅक्टर या उपकरणाने काढण्यात आले. जंत सामान्यपणे आतड्यामध्ये आढळून येतात, पण क्वचितच ते पित्ताशय नलिकेत आढळून येतात. जंतांच्या महाराष्ट्रातील एकूण रुग्णांपैकी १.२% रुग्णांमध्ये जंत पित्ताशय नलिकेत आढळून येतात. ”

- Advertisement -

का होतात जंत ?

कच्चे आणि न शिजलेले दूषित अन्न आणि पाण्यामुळे अशा प्रकारचे जंत होऊ शकतात. त्यांच्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर त्या व्यक्तीला पित्ताशय नलिकेमध्ये किंवा यकृतामध्ये संसर्ग होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -