तुझं माझं जमेना, वाद काही संपेना

ठाण्यातील सेना-भाजपमध्ये तू-तू, मै-मै कायम

Mumbai
shivsena-bjp
Shivsena Bjp

लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत आपली युती अभेद्य राहील अशा घोषणा नेत्यांनी केल्या असल्या तरी ठाण्यात सेना-भाजपची अंतर्गत धुसफूस कायमच आहे. त्याचा फटका निवडणुकीत बसणार या भीतीने सेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. नगरसेवकांनी बहिष्काराचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर आता भाजप नगरसेवक कृष्णा पाटील यांनी मालमत्ता कर माफीच्या मुद्यावरून शिवसेनेला टार्गेट केले आहे. मात्र कोणत्याही मुद्यावर प्रत्युत्तर न देता वादाकडे दुर्लक्ष करायचे असे कार्यकर्त्यांना सक्त आदेश देण्यात आले असल्याचे काही कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

मुंबईकर जनतेला 500 चौरस फुटापर्यंत असलेल्या घराची मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा मंत्री मंडळ बैठकीत करण्यात आली. मात्र मागील ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने मोठा गाजावाजा करत 500 चौरस फुटापर्यंत घर असलेल्या ठाणेकरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी कधी होणार, असा सवाल भाजपा नगरसेवक कृष्णा पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर केला आहे. त्यामुळे शिवसेनेला विरोधकांपेक्षा मित्र पक्षांच्याच प्रश्नाला अधिक सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत कोणाला कशा प्रकारे उत्तरे द्यायची हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

फेब्रुवारी 2017 साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी 500 फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार असल्याची ग्वाही दिली होती. तसेच जाहिरनाम्यातही आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर या घोषणेचा शिवसेनेला विसर पडला आहे. 7 डिसेंबर 2017 रोजी भाजपा नगरसेवक कृष्णा पाटील आणि नगरसेविका नंदा पाटील यांनी महापौरांना एक लेखी पत्र देऊन पक्ष प्रमुखांनी दिलेल्या घोषणेचे स्मरण केले होते. तसेच मालमत्ता कर माफीच्या प्रस्तावाची सूचना नगरसेवक कृष्णा पाटील यांनी महापौरांना देऊन आगामी डिसेंबर 2017 च्या महासभेत चर्चा करुन ठाणेकरांना करमाफी देण्याची विनंती केली होती. मात्र आजपावेतो ठाणेकरांच्या 500 फुटापर्यंतच्या घरांना करमाफी मिळालेली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 500 चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफीची भेट मुंबईकरांना देण्यात आली. त्याचप्रमाणे ठाण्यातही हाच निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करून भाजपने सेनेबरोबर असलेले तू-तू, मै-मै दाखवून दिले असल्याची चर्चा ठाणेकरांमध्ये रंगली आहे. ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी एकीकडे ठाण्यातील भाजप नगरसेवकांनी दंड थोपटले असताना पुन्हा एकदा मालमत्ता कराच्या निर्णयावर भाजप नगरसेवक ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here