घरमुंबईआता सर्व शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम

आता सर्व शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम

Subscribe

शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीची स्थापना

राज्यातील सर्व शाळांसाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार करण्याचे ठरवले आहे. यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयबी) कायमचे बंद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी घेतला. यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जाहीर करून हे मंडळ कायमचे बरखास्त करण्यात आले आहे. तसेच या मंडळाशी संलग्नित शाळा पुन्हा राज्य शिक्षण मंडळाशी संलग्नित करण्यात येणार आहेत.

सर्व मुलांना एकसमान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे शासनाचे धोरण असताना काही मोजक्या मुलांसाठीच उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करण्याकरिता संलग्नता देणे योग्य आहे का, असा आक्षेप घेण्यात आला होता. कोणत्याही नवीन अभ्यासक्रमास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे, पण तसे करण्यात आले नाही. राज्याची दोन परीक्षा मंडळे असू नयेत, असे शालेय शिक्षण विभागाचे मत असल्याने वरील निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शालेय शिक्षण विभागाच्या अनुदान मागण्यांवर बोलताना वर्षा गायकवाड यांनी भाजप सरकारच्या कार्यकाळात स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील गैरप्रकारांची माहिती दिली होती.

- Advertisement -

शिक्षण समिती सदस्य
डॉ. विजय भटकर, सीबीएसई, आयजीसीएसई, आयबी बोर्डाचे प्रतिनिधी, प्रथमचे माधव चव्हाण, राधा गोएंका आदींचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -