घरमुंबईजीवाची पर्वा न करता हल्लेखोराकडून चॉपर हिसकावला

जीवाची पर्वा न करता हल्लेखोराकडून चॉपर हिसकावला

Subscribe

निःशस्त्र पोलीस उपनिरीक्षकाच्या धाडसाचे कौतूक

शस्त्रधारी हल्लेखोर शस्त्राच्या धाकाने लोकांना बाजूला करून पुढे पळतो. एक निःशस्त्र पोलीस अधिकारी मात्र जीवाची पर्वा न करता त्याचा पाठलाग करतो. त्याच्याशी सामना करून त्याचे शस्त्र काढून घेतो आणि त्याला गजाआड करतो, हे एखाद्या चित्रपत्रातील थरारक दृश्य नाही, तर बदलापुरात घडलेला प्रकार आहे आणि ही हिंमत दाखवली आहे बदलापुरातील जिगरबाज पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ जाधव यांनी.

रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बदलापूर पश्चिमेकडील मांजर्ली परिसरात एक इसम चॉपर घेऊन एका महिलेच्या मागे धावत असल्याचे सकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना दिसले. गणेश चौकातून दत्त चौकाकडे जाणार्‍या रस्त्याच्या उतारावर या इसमाने महिलेवर वार केल्याने एकच खळबळ उडाली. त्या महिलेला वाचवण्यासाठी काही जणांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला, परंतु हल्लेखोराने चॉपरचा धाक दाखवल्याने लोक मागे हटले. याच भागात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ जाधवही राहतात. ते नुकतेच मॉर्निंग वॉक करून घरी आले होते. त्यांना या महिलेचा ओरडण्याचा आवाज आल्याने काय झाले हे पाहण्यासाठी ते धावत खाली आले. त्यावेळी एक इसम एका महिलेच्या मागे हातात चॉपर घेऊन धावत असल्याचे त्यांना दिसले.

- Advertisement -

त्यामुळे त्यांनी तातडीने या हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाधव यांनी मोठ्या शिताफीने हल्लेखोराच्या हातातील चाकू काढून घेऊन त्याला पकडले. तोपर्यंत त्याने महिलेच्या पाठीवर व चेहर्‍यावर काही वार केले होते. त्यामुळे जाधव यांनी तत्काळ या महिलेला बदलापूर ग्रामीण रुग्णालयात नेले आणि हल्लेखोराला बदलापूर पश्चिम पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्लेखोराचे नाव गौतम उघडे(45) असे असून, तो वांगणी येथे राहणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी दाखवलेल्या या धाडसाचे बदलापुरात सर्वत्र कौतुक होत असून, बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी त्यांचे विशेष कौतूक केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -