घरमुंबईमातोश्री ‘चाणक्य’ बदलतेय का?

मातोश्री ‘चाणक्य’ बदलतेय का?

Subscribe

‘बाबा कुणासाठी चाणक्य असेल तर कुणासाठी बिरबल, पण आमच्यासाठी तो आमचा बाबाच आहे’, असे उर्वशी संजय राऊत हिने दिल्लीत बुधवारी प्रसारमाध्यमांच्या समोर सांगितले. आणि सत्तेसहित राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे वेध लागलेल्या ‘मातोश्री’ने आपला ‘चाणक्य’ बदलला का? याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या सत्तासंघर्षात उध्दव ठाकरे यांचा गेली २५ वर्षे चाणक्य म्हणून वावरणार्‍या स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बॅड-पॅच सुरू आहे का, असा प्रश्न शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेससह अन्य पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही पडला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे २४ ऑक्टोबरपासून शिवसेनेने सत्तेचे समान वाटप असा घोषा सुरू केल्यावर सत्तासंघर्ष इतका चिघळेल असे कुणालाच वाटले नव्हते. मात्र २६ तारखेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंना खोटे ठरवल्यावर खासदार संजय राऊत यांनी सकाळ-संध्याकाळ मुलाखतींचा सपाटा लावल्यावर परिस्थिती आणखीन चिघळली. महाशिवआघाडीचे सरकार आश्चर्यकारक बनवण्याइतपत परिस्थिती बिघडली.
या सगळ्या राजकीय धुमशानात एरव्ही केंद्रबिंदू असणारे उध्दव यांचे स्वीय सचिव, पक्षसचिव मिलिंद नार्वेकर यांना खूपच मर्यादित भूमिका देण्यात आली होती. त्यातही काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्याशी बोलून त्यांचे पाठिंब्याचे पत्र मिळवण्याची जबाबदारी मिलिंद यांच्यासह प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर सोपवण्यात आली होती. तिथे ही जबाबदारी या दोघांनाही फत्ते करता आली नाही आणि राज्यपालांच्या भेटीत शिवसेना पुरती उघडी पडली.

- Advertisement -

दुसर्‍या बाजूला संजय राऊतही अपयशी ठरतात की काय असे वाटत असतानाच त्यांना बुधवारी रात्री नशिबाने साथ दिली आणि बोलणी सकारात्मक होत असल्याचे संकेत काँग्रेस नेत्यांनी दिल्यावर राऊत कन्येनं प्रसारमाध्यमांना ‘चाणक्य’ प्रतिक्रिया दिली. उध्दव ठाकरे युवानेते असल्यापासून मिलिंद नार्वेकर त्यांचे स्वीय सचिव म्हणून काम पहात आहेत. शाखाप्रमुख बनण्याचे स्वप्न घेऊन वांद्य्राच्या मातोश्रीवर आलेल्या मिलिंद यांनी पक्षप्रमुख होईपर्यंतच्या उध्दव यांच्या यशात खूपच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जी गोष्ट उध्दव यांना ध्वनित करायची नसते किंवा आपल्या हाताने करायची नसते ती गोष्ट ‘मातोश्री’ मिलिंद यांच्याकरवी घडवून आणते. त्यामुळे गेल्या १९९४ पासून सेनेचे नगरसेवक, आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यासह पालिकेचे आयुक्त-अधिकारी, बडे बिल्डर, पोलीस अधिकारी या सगळ्यांनीच नार्वेकर यांचा शब्द म्हणजे उध्दव यांचा आदेश असे समजायला सुरुवात केली. त्या जोरावरच मिलिंद यांनी उध्दव यांच्या वाटचालीत अडचणीचे ठरणार्‍या राणे-राज यांना पक्षाबाहेर काढले. तर सेनेची सत्ता असलेल्या महापालिकेच्या कारभारात ‘मातोश्री’ला अडचणीच्या वाटणार्‍या गोष्टी स्वत:च्या पदरात घेतल्या. अनेक पदाधिकार्‍यांच्या नेमणुकांपासून निवडणुकीचा ए-बी फॉर्मही नार्वेकर यांच्याच हातून दिले जात होते. या त्यांच्या कौशल्याने अनेक व्हीव्हीआयपींनी त्यांच्याशी मैत्री केली. त्यात अंबानी बंधूंपासून ते बच्चन परिवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांनाही नार्वेकर ‘आपले’ वाटू लागले. मागील पाच वर्षांत फडणवीस यांच्याशी नार्वेकर यांची मैत्री खूपच घट्ट झाली. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवताना नार्वेकर-फडणवीस मैत्री आड येणार नाही, याची काळजी ‘मातोश्री’कडून घेतली जात असल्याचे सांगण्यात येते आहे.

युवासेनेच्या काही पदाधिकार्‍यांना, तसेच निवडणुकीपूर्वी पक्षात आलेल्या काही नेत्यांना तसेच मातोश्रीच्या वर्तुळातील काहींना पक्षप्रमुख उद्धव यांचा चाणक्य बनण्याचे वेध लागले आहेत. याबाबतीत सेनेच्या एका मराठवाड्यातील ज्येष्ठ नेत्याला विचारले असता तो म्हणाला, नार्वेकर यांची कार्यशैली बाहेरच्या माणसांना कदाचित आवडणारी किंवा रुचणारी नसेल; पण शिवसेनेचे पदाधिकार्‍यांचे जाळे आणि पक्षातील नेत्यांची अंतर्गत धुसफूस प्रत्येकाचे बलाबल या सार्‍यांची अचूक आणि बित्तम माहिती आत्ताच्या घडीला शिवसेनेत फक्त मिलिंद नार्वेकर यांच्याकडेच आहे. त्यांच्या तोंडचा फटकळपणा हा इतरांना दुखावणार असला तरी ‘मातोश्री’ला मात्र विशेषत: आमच्या सर्वोच्च नेतृत्वाला सुखावणारा असाच आहे. मुंबईतील सेनेचे एक माजी महापौर आपले नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, नार्वेकर यांच्या शब्दांमुळे आणि निर्णयामुळे मलाही पदावर असताना त्रास झालेला आहे, पण ते इतर काही नेत्यांप्रमाणे मनात कपट ठेवून वागत असल्याचे मला जाणवले नाही. जी गुणवैशिष्ठ्ये मिलिंदकडे आहेत ती पाहता त्यांना पुढची अनेक वर्षे मातोश्री दुरावेल, असे मला वाटत नाही, कारण नार्वेकर जितका वेळ आदरणीय उद्धवजींना देतात आणि त्यांच्या कामाचा भार हलका करतात ते पाहता संघटनेचा फायदाच होत आहे. आता पक्षाचा फायदा होताना नार्वेकर यांचा व्यझिक्तगत फायदा झाला तर कोणाच्या पोझ्र्रटात दुखत असेल तर ते सांगण्याचा माझा आवाका नाही. पण तसं तर ‘मातोश्री’च्या आशिर्वादाने अनेकांनी आपले हित साधून घेतलेच आहे, मग ते उद्धव साहेबांच्याच सचिवाने घेतले तर कुठे बिघडले?, असा सवालही या माजी महापौरांनी केला.

- Advertisement -

मिलिंद नार्वेकर यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला गेल्या काही वर्षांपासून धुमारे फुटत आहेत, मात्र त्याच वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रकृती आणि त्यांच्यावर असलेला कामाचा ताण पाहता मिलिंद नार्वेकर यांच्यासारख्या समर्पित व्यक्तीला बाजूला करू नये, असा सल्ला उद्धव यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना दिला होता. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना नजिकच्या काळात विधान परिषदेत नियुक्ती करून संसदीय मांडणीत बसवणार की मातोश्री त्यांना पुन्हा किचन कॉबिनेटमध्येच ठेवणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -