कस्तुरबामध्ये नवा आयसोलेशन वॉर्ड

संसर्गजन्य आजाराचे वॉर्ड वातानुकूलित

kasturba hospital

मुंबईतील संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांना महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले. विविध संसर्ग आजारांसह हवेतून पसरणार्‍या संसर्गजन्य रोगांचे रुग्ण भरती होतात. कस्तुरबा रुग्णालयामध्ये हवेतून पसरणार्‍या संसर्गजन्य रोगांनी बाधित असलेल्या रुग्णांकरता स्वतंत्र कक्ष अर्थात आयसोलेशन वॉर्ड निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे या रुग्णांकरताच कस्तुरबा रुग्णालयांतील विद्यमान कक्षाचे रुपांतर स्वतंत्र कक्षामध्ये करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालय हे ५१५ रुग्ण खाटांचे मुंबईतील एकमेव संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय असून याठिकाणी प्रामुख्याने हिवतात, विषमज्वर, लप्टो, डेंग्यू, कावीळ, डांग्या खोकला इत्यादी रोगावर उपचार केले जातात: तसेच या रुग्णालयांमध्ये हवेतून पसरणार्‍या संसंर्गजन्य रोगांचे जसे की स्वाईन फ्लू, सार्स, मेर्स, इबोला आदी रुग्णांनाही भरती केले जातात. जेव्हा अशा रोगांचे प्रमाण वाढते,तेव्हा रुग्णांना स्वतंत्र कक्षामध्ये ठेवणे आवश्यक असते. यामुळे कस्तुरबा रुगणालयामध्ये हवेतून पसरणार्‍या संसर्गजन्य रोगांनी बाधित असलेल्या रुग्णांकरता स्वतंत्र कक्ष निर्माण करणे आवश्यक आहे.

या रुग्णांकरता कस्तुरबा रुग्णालयातील सध्याच्या कक्षाचे रुपांतर आयसोलेशन वॉर्ड सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी या आयसोलेशन वॉर्डमध्ये उच्चदाबाचे वातानुकूलित यंत्रणा, मेडिकल गॅस पाईपलाईन, अग्निशमन यंत्रणा, सी.सी.टिव्ही कॅमेरे, कक्ष व्यवस्थापन यंत्रणा विद्युत व इतर प्रकारची कामे केली जाणार आहे. यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून यासाठी आठ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यामुळे लवकरच कस्तुरबा रुग्णालयांंमध्ये आता खासगी रुग्णालयांप्रमाणा वातानुकूलित प्रशस्त आणि मोकळे सुसज्ज असे वॉर्ड तयार होणार असून या आयसोलेशन वॉर्डद्वारे एकप्रकारे संसर्ग प्रतिबंध केला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली आहे.

महापालिका रुग्णालयांमधील वॉर्डही होणार वातानुकूलित
केईएम,शीव आणि नायर या तीन प्रमुख रुग्णालयांमधील वॉर्डही आता वातानुकूलित करण्याचा निर्णय घेत त्यामध्येही बाहेरच्या संस्थांकडून स्वच्छता राखण्यात येईल,असाही निर्णय विद्यमान महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी घेतला आहे. त्यामुळे लवकरच त्यादृष्टीकोनातूनही महापालिका पाउुल उचलणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये खासगी रुग्णालयांप्रमाणे लूक दिसणार आहे.