घरमुंबईनिवासी डॉक्टरांच्या संपाचा रुग्णांना फटका, तिसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा संप सुरू

निवासी डॉक्टरांच्या संपाचा रुग्णांना फटका, तिसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा संप सुरू

Subscribe

जे.जे रुग्णालयात दोन निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीविरोधात निषेध नोंदवण्यासाठी सर्व डॉक्टर्स सामुहिक रजेवर गेले आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी वेद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी डॉक्टरांसोबत बैठक घेतली. पण, बैठकीत डॉक्टरांच्या मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यामुळे डॉक्टरांनी सलग तिसऱ्या दिवशीही संप सुरूच ठेवला. या संपाचा सर्वात जास्त परिणाम रुग्णसेवेवर झाला. सुरक्षेच्या मुद्द्यावरुन डॉक्टर आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या निष्फळ चर्चेत मोठ्या प्रमाणात रुग्ण भरडला जात आहे. जोपर्यंत रुग्णालयाच्या प्रत्येक वॉर्डमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक होत नाही, तोपर्यंत संपावर ठाम राहण्याचा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे.

“निवासी डॉक्टर्स, जे.जे अधिष्ठाता आणि वैद्यकीय शिक्षण अधिकाऱ्यांची मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतची बैठक झाली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सुरक्षेबाबतची उपाययोजना करण्याबाबत मंत्र्यांनी आश्वासन दिले . ग्राउंड लेव्हलला आश्वासनांची पूर्तता होण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत सर्व्हे केला जाईल. जे शक्य त्याची तात्काळ अंमलबजावणी झाल्यास कामावर रुजू होऊ. तोपर्यंत संप सुरू राहील.”

– अमोल हिकरे, सेन्ट्रल मार्ड, सेक्रेटरी

जे.जे. रुग्णालयात निवासी डॉक्टरांना शनिवारी सकाळी मारहाण झाली. या निषेधार्थ राज्य सरकारच्या चार ही म्हणजेच जे.जे, कामा, सेंट जॉर्ज, जी.टी आणि महापालिकेच्या सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पाठींबा कामबंद आंदोलनावर गेले. पण, रुग्णसेवेवर होणारा परिणाम थोड्या प्रमाणात कमी व्हावा यासाठी जे.जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी समांतर ओपीडी चालवण्याचा निर्णय घेतला. पण, या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या कमी झालेली दिसून आली. जे.जे. रुग्णालयात आपातकालीन परिस्थितीत येणाऱ्या रुग्णांना दाखल करुन घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उपचारांसाठी दूरहून आलेल्या रुग्णांना मात्र परतीची वाट धरावी लागली.

- Advertisement -

रुग्णालयात दाखल करुन घेण्यास डॉक्टरांचा नकार
बुलढाणा जिल्ह्यातील नंदूरामधून आलेल्या भास्कर इंगडे (४५) यांना जे.जे. रुग्णालयात सुरू असलेल्या संपाचा चांगलाच फटका बसला. भास्कर यांच्या अडीच महिन्यांपूर्वी शेतीच काम करत असताना ट्रॅक्टर पलटी झाला. खेड्यातील उपचार घेतल्यानंतर ही काही त्यांच्या पायाची सूज उतरली नव्हती. म्हणून रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी भास्कर सोमवारी जे.जे रुग्णालयात आले. पण, त्यांना रुग्णालयात कोणी दाखल करुन घेतलं नाही. शेवटी त्यांनी पुन्हा परतीच्या प्रवासाचा मार्ग निवडला.

उपचारासाठी आलेले बुलढाण्यातील भास्कर इंगडे

नंदूराहून ५०० किलोमीटरचा प्रवास करून आलेले भास्कर यांना औषधांची चिठ्ठी लिहून पाच दिवसानंतर यायला सांगितलं आहे. तर, त्यांच्यासोबतच आलेल्या श्रीकृष्णा तायडे यांच्या शरीराच्या पाठीमागे गाठ आली आहे. त्यांनाही ओपीडीत पाच दिवसांनी येण्याचा सल्ला देण्यात आला.

- Advertisement -

सेंट जॉर्ज रुग्णालयातील ३० निवासी डॉक्टर संपावर आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर, मेडिकल ऑफिसर आणि इंटर्न्स सध्या काम करत आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयातील आपातकालीन सेवा सुरू आहे, असे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील कांबळे यांनी सांगितले.

 

काळ्या फिती लावून डॉक्टर्स कामावर रूजू

जे.जे. रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या संपाला महापालिकेच्या शीव आणि केईएम रुग्णालयानेही पाठींबा दर्शवला. निवासी डॉक्टरांनी शीव रुग्णालयातील ओपीडी न चालवण्याचा निर्णय घेतला. तर, केईएममधील डॉक्टर काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत आहेत. शिवाय सोमवारी संध्याकाळी कँडल मार्च काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे केईएम रुग्णालयातील मार्डचे अध्यक्ष आलोक सिंग यांनी सांगितले.

शीव रुग्णालयात आलेल्या २३ वर्षीय मुनाफला हाताला फॅक्चर झाले होते. ते काढण्यासाठी म्हणून तो रुग्णालयात आला. धारावीत राहणारा मुनाफ सोमवारच्या ऑर्थोपेडीक विभागाच्या ओपीडीत गेला. पण, डॉक्टरच उपलब्ध नसल्याने खूप वेळ तात्काळत रांगेत उभा होता. शेवटी त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या ७५ वर्षीय आईला तीन दिवस सतत त्रास होत असल्यामुळे शीव रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन आलेल्या कल्पना शिंदे ऑफीसला सुट्टी घेतली होती. पण, डॉक्टरच नसल्यामुळे खूप वेळ पायऱ्यांवर बसून राहिल्या.

निवासी डॉक्टरांनी उपसलेल्या संपाच्या हत्यारावर मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पण, ठोस निर्णय न झाल्यामुळे तिसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा संप सुरूच राहिला.

 

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -