घरमुंबईजे.जे. हॉस्पिटलची सुपरस्पेशालिटी वर्षभरापासून कागदावरच!

जे.जे. हॉस्पिटलची सुपरस्पेशालिटी वर्षभरापासून कागदावरच!

Subscribe

आरोग्य विभाग आणि पीडब्ल्यूडीची टोलवाटोलवी नडली

जे.जे. हॉस्पिटलमध्ये उभारण्यात येणार्‍या सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या कामाला मार्चपूर्वी सुरूवात करण्याचा निर्धार आरोग्य विभागाने केला आहे. हॉस्पिटल उभारणीच्या निविदा काढण्याला मान्यता मिळून दीड महिना झाला तरी अद्याप प्रक्रिया सुरु करण्यात आली नाही. निविदा प्रक्रियेसाठी लेखी आदेश मिळाले नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) म्हणणे आहे, तर आरोग्य विभागाकडून तातडीने पत्र पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य विभाग व पीडब्ल्यूडीमधील टोलवाटोलवीमुळे हॉस्पिटलच्या उभारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

जे.जे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना एकाच छताखाली अद्ययावत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. पहिल्या वर्षातील कामासाठी सरकारने 10 कोटींचा निधीही तातडीने उपलब्ध करून दिला. परंतु वर्ष उलटले तरी कामाला सुरुवात न झाल्याने हा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात व्हावी व निधी परत जाऊ नये यासाठी 15 डिसेंबरला आरोग्य विभाग, पीडब्ल्यूडी व विविध विभागाच्या झालेल्या बैठकीत तातडीने निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.निविदा काढण्याला तातडीने मंजुरी देऊन तब्बल दीड महिना उलटला तरीही पीडब्ल्यूडीकडून अद्याप निविदा काढण्यात आलेली नाही.

- Advertisement -

हॉस्पिटलच्या उभारणीसाठी निविदा काढण्याची जबाबदारी पीडब्ल्यूडीकडे आहे. पण आरोग्य विभागाकडून निविदा काढण्याचे कोणतेही लेखी आदेश पीडब्ल्यूडीला दिलेले नाहीत. लेखी आदेश नसल्याने निविदा प्रक्रियेला मान्यता मिळून दीड महिला उलटला तरी पीडब्ल्यूडीकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. लेखी आदेशाअभावी निविदा प्रक्रियेला विलंब होत असताना 15 डिसेंबरला झालेल्या बैठकीत पीडब्ल्यूडीच्या अधिकार्‍यांना तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्याचे तोंडी आदेश दिले होते. तसेच त्यांना लगेचच निविदा प्रक्रियेबाबत पत्र पाठवण्यात आले, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

निविदेबाबत जाहिरात देऊन पुढील प्रक्रियेसाठी किमान तीन महिने लागतात. त्यामुळे पीडब्ल्यूडी व आरोग्य विभागामध्ये निविदा प्रक्रियेवरून सुरू असलेल्या टोलवाटोलवीमुळे मार्चपर्यंत हॉस्पिटलचे काम सुरू होण्याची शक्यता धुसर झाली आहे.

- Advertisement -

15 डिसेंबर झालेल्या बैठकीत निविदा काढण्यासाठी पीडब्ल्यूडीला तोंडी आदेश दिले होते. तसेच त्यांना पत्रही पाठवण्यात आले होते. त्यांना पत्र मिळाले नसेल तर त्यांना तातडीने दुसरे पत्र पाठवण्यात येईल.
– प्रवीण शिनगारे, संचालक, डीएमईआर

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -