घरमुंबईनाट्यगृहांमध्ये बसवण्यात येणार जॅमर!

नाट्यगृहांमध्ये बसवण्यात येणार जॅमर!

Subscribe

नाट्यगृहांमध्ये नाटकाचे प्रयोग सुरु असताना प्रेक्षकांकडून मोबाईल फोनचा वापर होत असल्याने नाट्यकलावंत विक्रम गोखले, सिध्दार्थ जाधव, सुमित राघवन, सुबोध भावे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे नाट्यगृहांमध्ये भ्रमणध्वनी प्रतिरोध यंत्रणा अर्थात जॅमर बसवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ही मागणी महापालिका प्रशासनाने मान्य करत लोकांसह नाट्यनिर्माते, संस्था आदींकडून हरकती आणि सूचना जाणून घेत महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील नाट्यगृहात कार्यक्रम सुरु करण्यापूर्वी सभागृहात ध्वनीक्षेपणाद्वारे भ्रमणध्वनी बंद ठेवण्याचे तसेच शांत राहण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले जाते. तसेच नाट्यगृहात आसने दाखवणारे स्वयंसेवकही प्रेक्षकांना भ्रमणध्वनीचा वापर न करण्याचे आवाहन करत असतात. एवढंच नव्हे, तर प्रयोग सुरु होण्यापूर्वीही नाट्यकलावंतांकडून अशा प्रकारच्या सूचना तसेच आवाहन केलं जातं. तरीही प्रयोगादरम्यान काही भ्रमणध्वनी वाजून कार्यक्रमात अडथळे निर्माण होत असतात. त्यामुळे केंद्र शासनाच्या संबंधित विभागाच्या पूर्व मंजुरीनंतरच नाट्यगृहात प्रशासनाकडून भ्रमणध्वनी प्रतिरोध यंत्रणा अर्थाज जॅमर बसवण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मागणी केल्यास जॅमरची सुविधा

नाट्यगृहात जॅमर बसवल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांना तसेच प्रेक्षकांना भ्रमणध्वनीद्वारे कोणताही संपर्क साधता येणार नाही. महापालिकेकडून बसवण्यात येणार्‍या जॅमरची सुविधा संबंधित नाट्यनिर्माता, संस्था, आयोजक तसेच आरक्षणकर्ते यांच्याकडून लेखी स्वरुपात मागणी केल्यास प्रशासनाच्या मंजूर अटी व शर्तींनुसार उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच ही जॅमर यंत्रणा बसवल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधितांची राहील.

- Advertisement -

प्रशासनाने मागवल्या हरकती-सूचना

महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन जॅमर बसवावेत किंवा कसे याबाबत तीन दिवसांच्या कालावधीमध्ये नाट्यनिर्माते, संस्था यासह नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवून त्यानुसार निर्णय घेण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या अखत्यारित येणार्‍या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्यात यावा, जेणेकरून नाट्य रसिकांना विनाव्यत्यय नाट्यप्रयोग पाहता येईल, अशी मागणी केली होती. नाट्यगृहांमधील भ्रमणध्वनींमुळे शांततेच्या भंगासह नाट्य रसिकांचा रसभंग होत असल्याचे म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -