मुंबईसाठी जया बच्चन मैदानात, थेट संसदेत खासदाराला सुनावलं!

jaya bachchan on mumbai corona in parliament

कोरोना काळात महाराष्ट्र सरकारकडून किंवा मुंबई शहर प्रशासनाकडून योग्य पद्धतीने काम केलं जात नसल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असून लॉकडाऊन वाढवावे लागत आहेत अशी टीका वारंवार विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, आता मुंबईसाठी थेट समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी मैदानात उडी घेतली आहे. मुंबईत कोरोना संदर्भात कशा पद्धतीने काम होत आहे, यावरून भाजपचे महाराष्ट्रातील खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी राज्य सरकारवर आणि मुंबई शहर प्रशासनावर टीका करणारी टिप्पणी आज राज्यसभेत केली. मात्र, त्यावर जया बच्चन चांगल्याच भडकल्या. मुंबईत होत असलेल्या कोरोना मोहिमेसंदर्भात आणि प्रशासनाच्या कामगिरीबाबत त्यांनी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांना सडेतोड शब्दांत उत्तर देत सुनावलं.

नेमकं झालं काय?

राज्यसभेमध्ये कोरोनाविषयी चर्चा सुरू असताना भाजपचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी कोरोनाविषयी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती गंभीर असल्याची भूमिका मांडली. ‘महाराष्ट्रात आणि मुंबईत आपत्ती व्यवस्थापनाचं नुकसान झालेलं आहे. राजकीय मतभेद आणि प्रशासनाच्या वादात हे नुकसान झालं आहे. बिगीन अगेन हे म्हणताना बिगीन लॉकडाऊन अगेन त्यांना करायचं होतं. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला. बदल्यांचं देखील राजकारण करण्यात आलं. राज्यातल्या अधिकाऱ्यांना २ वाजता एका ठिकाणी बदली होते आणि ४ वाजता सांगितलं जातं दुसरीकडे बदली होते. मुख्यमंत्री मंत्रालयातून काम न करता घरी बसून काम करत असल्यामुळे हे होत आहे. कोविडच्या टास्कफोर्स डॉ. संजय ओक यांच्या नेतृत्वात बनवली गेली. पण या टास्कफोर्सच्या शिफारशींकडे कुणीही लक्ष देत नाही. पुणे, मुंबई, ठाणे या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. जंबो कोविड सेंटरमध्ये भाड्याने बेड घेतले गेले. राज्यात ७ हजार ९८५ पदं आरोग्य खात्यात मंजूर आहेत. पण त्यात १२०० हून जास्त पदं भरली गेलेलीच नाहीत’, अशा शब्दांत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरत टीका केली.

माझ्याही घरी कोरोनाची लागण झाली होती – जया बच्चन

मात्र, त्यांची भूमिका ऐकून समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या चांगल्याच संतप्त झाल्या. ‘मी घरी जायला निघाले होते. पण डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचं भाषण ऐकून मी परत आले. मी त्यांचा सन्मानच करते. पण त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर माझा आक्षेप आहे. माझ्या कुटुंबात देखील कोरोनाची बाधा झाली होती. पण त्या काळात फक्त त्यांचीच नाही, तर रुग्णालयातल्या प्रत्येकाचीच उत्तम प्रकारे देखभाल केली जात होती. मुंबईतल्या रस्त्यांवर प्रत्येक तासाला सॅनिटायझेशन केलं जात आहे. मुंबईत सुरू असलेलं हे काम अतुलनीय आहे. या मुद्द्यावरून राजकारण व्हायलाच नको. हे चुकीचं आहे’, असं जया बच्चन यावेळी म्हणाल्या.

बच्चन कुटुंबात खुद्द अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात दाखल होऊन आवश्यक ते उपचार घेतल्यानंतर त्यांना निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर घरी सोडण्यात आले.