घरताज्या घडामोडीजाहिरातींवर मोदींचा फोटो छापण्याची गरज नाही - जयंत पाटील

जाहिरातींवर मोदींचा फोटो छापण्याची गरज नाही – जयंत पाटील

Subscribe

राज्य सरकारच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील फोटो मुख्यमंत्र्यांसोबत छापण्यात यावा, अशी मागणी करणारं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. त्यावर जयंत पाटील यांनी भूमिका मांडली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली आहे. यानुसार राज्य सरकारच्या कामांच्या छापल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान मोदींचे देखील छायाचित्र छापले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेच याबाबत निर्णय दिलेला आहे, असं देखील या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र, त्यावर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. ‘या जाहिराती राज्य सरकारच्या पैशातून राज्य सरकारच्या उपक्रमांबद्दल छापल्या जातात. त्यावर पंतप्रधानांचा फोटो छापण्याची गरज नाही’, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

‘फडणवीसांवर दिल्लीचं दडपण असेल!’

‘महाराष्ट्र सरकारने जर योजना काढल्या असतील, तर त्यावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायला हवा. केंद्र सरकारने काढलेल्या योजनांच्या जाहिरातींवर पंतप्रधानांचा फोटो वापरायला कुणाचीही हरकत नसेल. पण जर महाराष्ट्र सरकारच्या योजनेची जाहिरात असेल, त्यात केंद्र सरकारचा फारसा हिस्सा नसेल आणि राज्य सरकारच्याच निधीतून ज्या योजना केल्या जात असतील, अशा योजनांच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधानांचे फोटो वापरण्याची आवश्यकता नाही. भाजपने देखील तसा आग्रह धरू नये. देवेंद्र फडणवीस यांच्या मनाला देखील ते पटत नसेल, पण दिल्लीहून दबाव आल्यामुळे कदाचित ते तसा आग्रह धरत असतील’, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘भाजपला शरद पवारांची भिती’

दरम्यान, यावेळी ‘मनसेच्या भगवीकरणामागे शरद पवारांचा हात’, या भाजपच्या टीकेवर जयंत पाटील यांनी बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली. भाजप शरद पवारसाहेबांना घाबरतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. मनसेसोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली मात्र आता पवारसाहेबांवर आरोप करणं योग्य नाही असेही जयंत पाटील म्हणाले. हिंदुत्वाची मतं फुटू नये एवढंच काम भाजप करतो की, देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व समाजांचेही काम करतो असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -