आयारामांच्या मंत्रिपदाच्या चर्चेमुळे शिवसैनिक अस्वस्थ!

शिवसेनेमध्ये मिळालेलं एकमेव मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयत्या वेळी शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Mumbai
Shivsena
शिवसेना

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १४ जून रोजी होण्याची शक्यता असून, या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला असलेले एक मंत्रिपद शिवसेनेला देण्यात येणार असून, लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आता यावरून शिवसेनेमध्ये नाराजी सुरू झाली असून, ‘आयारामांना मंत्रिपद देऊ नये’, असे काही खासदारांनी खासगीत बोलताना सांगितले आहे.

काय आहेत शिवसैनिकांची भावना?

‘शिवसेनेमध्ये असे अनेक आमदार आहेत जे पडत्या काळात देखील शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे त्यांना एखादं मंत्रिपद द्यावं, जे आयत्या वेळी पक्षात येतात त्यांचा विचार देखील करू नयेत’, अशी भावना काही शिवसैनिकांनी आणि आमदारांनी बोलून दाखवली. जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. बीड विधानसभेची जागा युतीमध्ये शिवसेनेकडे असल्याने त्यांनी भाजपमध्ये न जाता सेनेत प्रवेश केला आहे.


पाहा व्हिडिओ – राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत

शिवसेनेची फसगत?

दरम्यान, शिवसेनेला एकच मंत्रिपद मिळणार असल्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग सुरू झाले आहे. मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याच्या चर्चांमुळे शिवसेनेची फसगत झाल्याचं बोललं जात आहे. तसेच, लोकसभेत देखील उपसभापतीपद शिवसेनेऐवजी YSR काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता असल्यामुळे शिवसेनेच्या हाती काहीही लागले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.