घ्या, आता Jio कॉलसाठी सुद्धा ग्राहकांना पैसे मोजावे लागणार!

जिओच्या ग्राहकांना प्रतिस्पर्धी फोन नेटवर्कवर केलेल्या व्हॉईस कॉलसाठी प्रति मिनिट ६ पैसे आकारण्यात येणार आहेत.

Mumbai
Jio-Logo

कॉल टर्मिनेशन शुल्कासाठी असलेल्या कलमाच्या पुनरावलोकनाच्या अनिश्चिततेमुळे जिओने ग्राहकांना व्हॉईस कॉलसाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिओच्या ग्राहकांना प्रतिस्पर्धी फोन नेटवर्कवर केलेल्या व्हॉईस कॉलसाठी प्रति मिनिट ६ पैसे आकारण्यात येणार आहेत. एकीकडे व्हॉईस कॉलसाठी शुल्क आकारणीचा निर्णय घेतल्यानंतर ग्राहकांना व्हॉईस कॉलसाठी आकारण्यात येणाऱ्या समान किंमतीचा डेटा विनामूल्य देण्यात येणार आहे. या बाबतचे निवेदन जिओने जाहीर केले आहे.

जिओने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “दूरसंचार ऑपरेटरने त्यांच्या वापरकर्त्यांद्वारे अन्य ऑपरेटरच्या नेटवर्कवर केलेल्या मोबाइल फोन कॉलसाठी प्रतिस्पर्धी पैसे देण्याची वेळ येईपर्यंत ६ पैसे शुल्क लागू राहील. हे शुल्क जिओ वापरकर्त्यांद्वारे इतर जिओ फोनवर केलेल्या कॉलवर आणि लँडलाईन फोनवर आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसटाइम आणि अशा इतर प्लॅटफॉर्मवर केलेल्या कॉलवर लागू नाही. सर्व नेटवर्ककडून येणारे कॉल विनामूल्य सुरू राहतील.”

म्हणून शुल्क आकारणीचा निर्णय

टेलिकॉम नियामक ट्रायने २०१७ मध्ये तथाकथित इंटरकनेक्ट युझर चार्ज (आययूसी) १४ पैशांवरून ६ पैसे प्रति मिनिटांवर आणला होता. आणि जानेवारी २०२० पर्यंत हे रेग्युलेशन संपुष्टात येईल, असे म्हटले होते. परंतु आता सदर शुल्क अजून काही काळ चालू ठेवावे अथवा नाही या टाइमलाइनचा आढावा घेण्यासाठी सल्लामसलत पत्र पाठविले आहे. जिओ नेटवर्कवर व्हॉईस कॉल विनामूल्य असल्याने भारती एअरटेल आणि व्होडाफोन, आयडिया सारख्या प्रतिस्पर्ध्यांना देण्यात आलेल्या १३ हजार ५०० कोटी रुपयांची देणी कंपनीला सोसावी लागली. ट्रायच्या या धोरणामुळे झालेल्या नुकसानाची पूर्तता करण्यासाठी कंपनीने प्रतिस्पर्ध्याच्या नेटवर्कवर केलेल्या प्रत्येक कॉलसाठी ग्राहकांना प्रति मिनिट ६ पैसे घेण्याचे ठरविले आहे. जिओ वापरकर्ते व्हॉईस कॉलसाठी प्रथमच पैसे देतील. सध्या जिओ केवळ डेटासाठीच शुल्क आकारते आणि देशातील कोठेही आणि कोणत्याही नेटवर्कवर व्हॉईस कॉल विनामूल्य आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here