घरमुंबईठाण्यात जितेंद्र आव्हाडच उरले राष्ट्रवादीचे एकमेव आमदार

ठाण्यात जितेंद्र आव्हाडच उरले राष्ट्रवादीचे एकमेव आमदार

Subscribe

ठाण्यात आता केवळ जितेंद्र आव्हाड हेच आता राष्ट्रवादीचे एकमेव आमदार उरले आहेत. मागील पाच वर्षांपासून होत असलेल्या पक्षांतर्गत पडझडीमुळे ही स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढवली आहे. शहापूर विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा मंगळवारी सुपुर्द केला.

हा राष्ट्रवादी पक्षाला शहापूर तालुक्यात जबरदस्त राजकीय धक्का असून बरोरा हे बुधवारी सकाळी दादर येथील शिवसेना भवन येथे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व शिवसेना नेते ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून सेनेचे शिवबंधन बांधणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. २०१४ मध्ये केंद्रात भाजपाची तर राज्यात भाजपा व शिवसेनेच्या युतीची सत्ता आली. त्यानंतर सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिवसेनेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून ‘आऊटगोईंग’ सुरू झाले होते. या पक्षांतराचा खरा फटका राष्ट्रवादीला बसला.

- Advertisement -

युतीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीला गळती

याआधी ठाण्यातील मुरबाडचे आमदार किसन कथोरे, अपक्ष आमदार गणेश गायकवाड, नवी मुंबईतील आ. मंदा म्हात्रे यांना भाजपने आपल्याकडे वळवले आहे. तसेच ठाण्यातील दिवंगत वसंत डावखरे यांचे सुपुत्र निरंजन डावखरे यांना देखील भाजपने प्रवेश दिलेला आहे. त्यामुळे ठाण्यात आता जितेंद्र आव्हाड आणि नवी मुंबईत नाईक परिवार एवढेच नेतृत्व राष्ट्रवादीकडे उरले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने पालघर मतदारसंघ भाजपकडून मागून घेतला. त्यासाठी राजेंद्र गावित यांना भाजपमधून आयात करत सेनेत प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर आता शहापूर या आदिवासी मतदारसंघात देखील शिवसेनेने विद्यमान आमदाराला आपल्या पक्षात खेचण्यात यश मिळवले आहे.

राष्ट्रवादी सोडतो तो जिंकून येतो

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सोडून गेलेल्या अनेकांना निवडणुकीत विजय मिळाला आहे. २०१४ साली भिवंडीचे कपिल पाटील, सांगलीचे संजय काका पाटील हे राष्ट्रवादी सोडून गेले आणि खासदार झाले. त्यानंतर हेच चित्र विधानसभेलाही दिसले. किसन कथोरे, मंदा म्हात्रे, भारती लव्हेकर ही काही आमदारांची उदाहरणे झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील दिंडोरीच्या भारती पवार आणि हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने खासदारपदी निवडून आले. त्यामुळे राष्ट्रवादीतून निवडून येण्याची खात्री नसलेले अनेकजण भाजपसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -