कलानगर जंक्शन फ्लायओव्हरसाठी डिसेंबरची डेडलाईन

डिसेंबर २०२० रोजी वाहतुकीस खुला होणार

kalanagar flyover

मुंबई महानगर विभाग विकास प्राधिकरणामार्फत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वांद्रे पूर्व येथील कलानगर जंक्शन उड्डाणपूलाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग व वांद्रे-कुर्ला जोडरस्त्यासह इतर तीन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलामुळे कलानगर जंक्शनवरील वाहतूक कोंडी सुटून वाहतूक सुरळीत होण्यात मदत होणार आहे. यामुळे वाहतुकीच्या वेळात सुमारे १० मिनिटांची बचत होईल आसा अंदाज आहे.

या प्रकल्पाची एकूण किंमत १०३ कोटी रूपये इतकी आहे. या फ्लायओव्हरच्या कामाला २ जानेवारी २०१७ रोजी सुरूवात झाली होती. मे. सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हे याचे ठेकेदार आहेत. उपठेकेदाराची नियुक्ती दि. २९ जानेवारी २०२० रोजी करण्यात आली. उपठेकेदार मे. आरपीएफ इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लिमिटेड ही कंपनी आहे. हे काम ३१ डिसेंम्बर २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. या प्रकल्पात ८१७८८ मनुष्यबळ दिवसांचे कुशल कामगारांसाठी तर २४५३६५ मनुष्यबळ दिवसांचे काम अकुशल कामगारांसाठी निर्माण होईल असा अंदाज आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ७३ टक्के काम पूर्ण झाले असून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत या प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.

या प्रकल्पाच्या गर्डर चढवण्याचे महत्त्वाचे काम सुरू असताना शनिवारी मध्यरात्रीच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनीही उपस्थिती लावली. कलानगर जंक्शन उड्डाणपूल नियोजित वेळेत पूर्ण होऊन कार्यान्वित होणे ही गोष्ट मुंबई महानगर विभाग विकास प्राधिकरणाला अभिमानास्पद गोष्ट असून याने मुंबई महानगराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार ही समाधानाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर ए राजीव यांनी दिली आहे.

या उड्डाणपूलावरीव तीन मार्गिका खालीलप्रमाणे

१) मार्गिका- ब – वरळी – वांद्रे सागरी मार्गाकडून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी दोन पदरी मार्गिका. या मार्गिकेची लांबी -७१४.४० मीटर असून
व रुंदी – ७.५० मीटर असणार आहे

२) मार्गिका – क – वांद्रे-कुर्ला संकुलाकडून वांद्रे – वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी दोन पदरी मार्गिका. या मार्गिकेची लांबी – ६०४.१० मीटर आणि रुंदी – ७.५० मीटर असेल.

३) मार्गिका – ड – धरावी जंक्शनकडून वांद्रे – वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी असणार आहे. ही मार्गिकाही स्वतंत्र आणि दोन पदरी असून ही विना सिग्नल असणार आहे, या मार्गिकेची लांबी – ३१०.१० मीटर व रुंदी – ७.५० मीटर असेल.