घरमुंबईडोंबिवलीत मध्यरात्री दरोडेखोर आणि पोलिसांत धुमश्चक्री

डोंबिवलीत मध्यरात्री दरोडेखोर आणि पोलिसांत धुमश्चक्री

Subscribe

झारखंडमधील टोळीतील दोन दरोडेखोर गजाआड

वेळ मध्यरात्री दोनची…सामसूम रस्ता…सर्वत्र अंधार पसरलेला…रातकिड्यांची किरकिर.. सराईत दरोडेखोर येणार असल्याने कल्याण क्राईम ब्रॅन्चच्या पोलिसांनी सापळा रचला होता. अखेर ते सहा जण आले..पोलिसांची कुणकुण लागताच ते पळू लागले. दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. पण दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यातील चौघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. आलम मंटू शेख (42) आणि मंजूर मुनीफ शेख (39) हे झारखंडमधील दरोडेखोर असून पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून हत्यार हस्तगत करण्यात आली आहेत.

कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना दरोडेखोरांची एक टोळी डोंबिवलीच्या मानपाडा रोडला असलेल्या सांगाव येथील मोबाईलच्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच सोमवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिकारी संतोष शेवाळे, फौजदार निलेश पाटील, फौजदार नितीन मुदगुण, दत्ताराम भोसले, नरेश जोगमार्गे, विलास मालशेट्टे, ज्योतीराम साळुंखे, सुरेश निकुळे, अजित राजपूत, मंगेश शिर्के, निवृत्ती थेरे, प्रकाश पाटील आणि हरिश्चंद्र बांगारा या पथकाने सापळा रचला होता. तासाभराच्या कालावधीनंतर 6 दरोडेखोर त्याठिकाणी आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चार जणांनी अंधाराचा फायदा घेत डोंबिवली एमआयडीसीच्या दिशेने पळ काढला. मात्र त्यातील दोन दरोडेखोरांच्या थरारक पाठलाग करून पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

- Advertisement -

आलम मंटू शेख (42, रा. पियारपुर, तालुका-राजमहल जिल्हा-साहेबगंज राज्य-झारखंड) या दरोडेखोराकडे एक काडतूस लोड केलेला गावठी कट्टा मिळाला. तर मंजूर मुनीफ शेख (39, रा. दिलारपूर गाव, तालुका मनिहारी जिल्हा-कटीहार राज्य-बिहार) याच्याकडे एक लोखंडी कटावणी, दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आले. या दोघांनाही पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी अनेक ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. झारखंडमध्ये त्यांची टोळी असून यातील आलम मंटू शेख हा प्लॅनर व एक खतरनाक दरोडेखोर आहे. त्याच्यावर झारखंड, तामिळनाडू व महाराष्ट्रात ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर पूर्वी 2017 मध्ये ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. सद्या हा दरोडेखोर जामिनावर बाहेर असून तरीही त्याने अनेक गुन्हे केले आहेत. शहरातील आलिशान मोबाईलच्या दुकानांना रात्रीच्या वेळेस भिंतीला भगदाड पाडून दरोडा टाकणार्‍या झारखंडमधील दरोडेखोरांच्या मुसक्या क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने आवळल्याने व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -