घरमुंबईकल्याण डोंबिवलीकरांचा जीव धोक्यातच

कल्याण डोंबिवलीकरांचा जीव धोक्यातच

Subscribe

चायजीन आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर अनधिकृत सिलेंडरचा वापर

कल्याणातील एका अनधिकृत चायनिज हॉटेलला लागलेली आग विझवत असतानाच अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन अग्निशमन दलाच्या जवानाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अनधिकृत हातगाडीवरील गॅस सिलिंडरचा प्रश्न चव्हाट्यावर आला असतानाही, पालिका प्रशासनाचे डोळे अजूनही उघडलेले दिसत नाहीत. कल्याण- डोंबिवलीत शहरात रस्त्यावर सर्रासपणे खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून अजूनही कोणतीच तपासणी अथवा कारवाई केलेली नाही.

२९ नोव्हेंबरला कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा परिसरातील चायनीज सेंटरला भीषण आग लागली होती. ही आग विझवत असतानाच अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन अग्निशमन दलाचे जवान जगन आमले यांना जीव गमवावा लागला होता. तर दुसरे जवान संदीप पालवे हे जखमी झाले होते. कल्याण -डोंबिवली शहरात जागोजागी व वर्दळीच्या ठिकाणी चायनीज आणि खाद्यपदार्थांच्या हातगाड्या थाटल्या आहेत. या हातगाड्यांवर सर्रासपणे बेकायदा सिलिंडरचा वापर केला जातो. व्यावसायिक सिलिंडरप्रमाणे घरगुती सिलिंडरचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. रस्त्याच्या कडेला उभ्या असणार्‍या या गाड्यांवर ग्राहकांची गर्दी दिसून येते. चहाच्या टपरीच्या शेजारीच अनेक हातगाड्या आहेत. तेथे अनेकजण सिगारेटचा झुरका घेतच जळत्या सिगारेटचे थोटके आजूबाजूला टाकतात.

- Advertisement -

त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. भर रस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी गॅस सिलिंडरचा वापर करणे हे बेकायदेशीर आहे, पण मात्र पालिका आणि पोलिसांकडूनच यांना अभय मिळत असल्याने त्यावर कारवाई करणार कोण? १९ एप्रिल रोजीही डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या डेांबिवली दरबार हॉटेलला गॅसच्या गळतीमुळे भीषण आग लागली होती. भरदुपारी ही घटना घडल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले, मात्र हॉटेल आगीत भस्मसात झाले होते. कल्याणच्या घटनेनंतर पालिका प्रशासनाकडून रस्त्यावर बेकायदेशीपणे सुरू असलेल्या हातगाड्यांवरील गॅस सिलिंडरवर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र या घटनेला आठवडा उलटल्यानंतरही पालिकेने अजून कोणतीच कारवाई केलेली नाही. पालिका व पोलीस यंत्रणेचा कानाडोळा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत

पालिका म्हणते लवकरच कारवाई 

काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम आणि पदपथ अडविणार्‍या दुकानदारांवर कारवाई सुरू आहे. त्यामुळे आता अनधिकृत हातगाडी व चायनीज गाडीवरही लवकरच कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisement -

अनधिकृत चायनीज स्टॉलमधील गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे अग्निशमन दलाचा जवान मृत्यूमुखी पडला ही अतिशय दु:खदायक घटना आहे. खाद्यपदार्थ आणि चायनीज गाड्यांवर महापालिकेचा कोणताही वचक नाही. शहरात अनधिकृत फेरीवाले, हातगाडी, चायनीज गाडी आणि धाबे या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात. मात्र या ठिकाणी कुठल्याही नियमांचे पालन होत नाही. सर्वसामान्य माणसांना गॅस सिलिंडर घेताना अनेक कागदपत्रे द्यावी लागतात. पण अनधिकृत हातगाडी आणि चायनीज गाड्यांना लगेच गॅस सिलिंडर कसे मिळतात? या सिलिंडर कंपन्यावर आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे.
-श्रेयस समेळ, सभागृहनेता केडीएमसी 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -