कल्याण रिंगरूट प्रकल्प : आधी मोबदला, मग प्रकल्प – प्रकल्प बाधितांची भूमिका

Kalyan
kdmc
कल्याण-डोंबिवली महानगर पालिका

कल्याण-रिंगरूट प्रकल्पात उंबर्डे कोलीवली येथील रहिवाशी मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. या प्रकल्प बाधितांना कल्याण डोंबिवली महापालिकेकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र बाधितांना काय मोबदला देणार? हे सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रकल्प बाधितांमध्ये नाराजीचा सूर आहे. आधी योग्य मोबदला द्या, नंतर प्रकल्प राबवा अशी भूमिका प्रकल्पबाधितांनी घेतली आहे. त्यामुळे महापालिका यावर काय तोडगा काढते? याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय.

‘विकासाला विरोध नाही, पण मोबदला योग्य हवा’

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रिंगरुट प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. शहराला जोडणारा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे बाधितांना महापालिकेने नोटिसा पाठवण्याची सुरुवात केली आहे. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे, कोळवली या भागात पालिकेने प्रकल्प बाधितांना नोटिसा पाठवल्या आहेत. या प्रकल्पात जागा जाणार आहे. तसेच काही नागरीकांची घरे तुटणार आहेत. स्थानिक भूमीपूत्र असल्याने एका कुटुंबामागे अनेक लोक आहेत. प्रकल्प बाधितांना नक्की काय मोबदला देण्यात येणार? हे निश्चित नसताना त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधित भितीच्या सावटाखाली आहेत. महापालिकेने योग्य मोबदला द्यावा अशी मागणी बाधितांनी केली आहे. आम्ही बाधितांच्या सोबत आहोत. विकासाला विरोध नाही. मात्र बाधितांना मोबदला दिला जावा अशी मागणी केली आहे.