अखेर कल्याणचा धोकादायक पत्री पूल पाडण्यास सुरुवात

महिनाभरापासून कल्याणचा धोकादायक झालेला पत्री पुल आजपासून पाडण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसापासून हा पुल पाडण्याच्या चर्चा होत्या अखेर आजपासून त्याला सुरुवात झाली आहे.

Kalyan
kalyans patri bridge demolition work start
कल्याणचा पत्री पूल पाडण्यास सुरुवात

कल्याणचा पत्री पूल पाडण्याचा कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. धोकादायक ठरलेला हा पूल गेल्या महिनाभरापासून वाहतुकिसाठी बंद करण्यात आला होता. २५ सप्टेंबरनंतर म्हणजेच गणेशोत्सवानंतर हा पूल पाडण्यात येणार असल्याचे केडीएमसीने सांगितले होते. त्यानुसार आज हा पूल पाडायला सुरुवात झाली आहे.

पूल तोडण्याचे काम सुरु

अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. यामध्ये कल्याणचा पत्री पूल आणि लोअर परेलचा पूल धोकादायक असल्याचे समोर आले होते. आयआयटी मुंबई, केडीएमसी आणि रेल्वेने केलेल्या ऑॉडिटमध्ये १०४ वर्षाचा जुना पत्री पूल धोकादायक असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या पुलावरुन अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. हा पुल लवकरात लवकर पाडण्यात यावा असे आदेश केडीएमसीला देण्यात आले होते.

नविन उड्डाणपुल उभारणार

केडीएमसीने त्यानुसार आजपासून हा पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. पुलावरील डांबर काढण्यात आले असून आता पुलावरील युटिलिटी सर्व्हिसेस काढण्यात येणार आहे. त्यानंतर मेगाब्लॉक घेऊन पत्री पुलाचा गर्डर काढण्यात येईल. पूल संपूर्ण काढल्यानंतर तीन महिन्यानंतर याच ठिकाणी नवा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.