घरमुंबईकमलाकर जामसंडेकर हत्या : कुख्यात डॉन अरुण गवळीची जन्मठेप कायम

कमलाकर जामसंडेकर हत्या : कुख्यात डॉन अरुण गवळीची जन्मठेप कायम

Subscribe

पोलिसांनी तपास केला असता कुख्यात डॉन अरुण गवळीच्या सांगण्यावरुनच मारेकऱ्यांनी जामसंडेकर यांची हत्या केल्याचे सांगितले होते.

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीसह इतर आरोपींना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई हायकोर्टाने आज कायम ठेवली. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. २ मार्च २००७ रोजी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची मुंबईतील असल्फा भागातील त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तपास केला असता कुख्यात डॉन अरुण गवळीच्या सांगण्यावरुनच मारेकऱ्यांनी जामसंडेकर यांची हत्या केल्याचे सांगितले होते.

अरुण गवळीने दिली होती सुपारी

दरम्यान शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी यास हत्या, हत्येचा कट रचणे या आरोपांखाली मोक्कांतर्गत २००८ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१२ मध्ये मुंबईतील विशेष कोर्टाने अरुण गवळीला १४ लाख रुपयांचा दंड ठोठावत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याच्यासह अन्य दहा आरोपींनासुद्धा या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर अरुण गवळीसह इतर आरोपींनी जन्मठेपेच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले. पण आजच्या सुनावणीत मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. कुख्यात गुंड अरुण गवळी याने कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येसाठी ३० लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

काय होतं प्रकरण?

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचं सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीबरोबर प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. त्यानंतर सदाशिव सुर्वेनेच गवळीच्या हस्तकांमार्फत जामसंडेकर यांची सुपारी दिली होती. कुख्यात गुंड गवळीने प्रताप गोडसेकडे ही सुपारी सोपवली. या प्रकरणी नाव न येण्यासाठी नवे शूटर्स शोधण्यात आले. गोडसेने या कामगिरीसाठी श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली होती. यासाठी दोघांनाही प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे निश्चित करुन प्रत्येकी २० हजार रुपयांचे अॅडव्हान्स सुद्धा देण्यात आले होते. विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वाल सोबत जवळपास १५ दिवस जामसंडेवर पाळत ठेवली. अखेर २ मार्च २००७ रोजी जामसंडेकर यांची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -